पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रोगाचे निश्चित स्वरूपाचे कारण कळणे सहज शक्य होईल. उदाहरणार्थ, रक्तदोष जर निर्माण झाला तर हिमोग्लोबिनची तपासणी करून त्या दोषाची निश्चिती ठरवता येते. याचा अर्थ असा की त्या मोलिक्यूलमधील जे अणू आहेत त्यांची निरोगी अवस्थेतील रचना बदलून हे घडत असते. अंती मृत्यूलाही हे कारण घडू शकते.
 आधुनिक वैद्यकाचा विकास म्हणजे ह्या संकल्पनेवर आधारित मार्गक्रमणां. प्रत्येक रोगाचे निदान या पद्धतीने केले जाते. एक उदाहरणच घेऊ या. हृदयविकार हा एक अनैसर्गिक, आपणच ओढवून घेतलेला रोग. याला थोडासा अपवाद म्हणजे शरीरन्हास. पण तरुणपणी, मध्यम वयात येणारा आघात याची अनैसर्गिक जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार, व्यसने व ताणतणाव ही कारणे सांगितली गेलेली आहेत. आज हृदयरोगाने होणारे मृत्यू व त्यांची संख्या ही काळजीकारक आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यात आतल्या अस्तराला कोलेस्टरॉल चिकटून तेथील रक्तप्रवाहाचा मार्गच लहान होतो किंवा कुंठतो. ह्या रोगात प्रथम औषधे देऊन कोलेस्टरॉलचा थर नाहीसे करण्याचा प्रयत्न केला जातो. हे प्रयत्न फक्त वरवरचे असतात. अगदी बायपास किंवा अँजिओप्लॅस्टी अशा अत्यंत आधुनिक पद्धतींनी सुद्धा त्यांचे मूळ कारण नष्ट होत नाही, कारण ही उपचारपद्धत अंगदी वरवरची आहे खरं तर कोलेस्टरॉलचा अणू त्या अस्तराला का चिकटतो हे शोधून काढणे ही गरज मूलभूत असते. इतर अनेक गंभीर आजारांचे बाबतीतही ही स्थिती आहे. उदाहरणार्थ कॅन्सर कधीच पूर्ण बरा होत नाही. मधुमेहाने एकदा पकडले की त्याची साथ जन्मभर सुटत नाही. रक्तदाब का निर्माण होतो? आपली त्या वेळी शरीराची सोडिअमची पातळी वर जाते का? सामान्य जीवन असून हे का होते? मूत्रपिंडे शरीराबाहेर जाणारा क्षार परत शरीरात पाठवतात का? यावरचा उपाय म्हणजे रक्तवाहिन्यांचा अंतर्भाग विस्तार करणे व सोडिअम कमी करणे, यासाठी औषधे. पण हा असतो वरवरचा उपाय. रक्तदाब व सोडिअम अणू यांचा निकटचा संबंध गृहीत धरला तर या अणूशी परिणामकारक असा कोणता अणू आपल्याला पोटात घ्यावा लागेल की जो रक्तदाब निर्माण करणाऱ्या अणूंना सफलपणे प्रतिकार करू शकेल? मूळ शरीराच्या अणूमध्ये होणारा रोगकारक फरक रोग निर्माण करतो व वैद्यक उपचारात असा कोणता अणू (असलेले औषध ) असेल १२५