पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुटला. ते केस पूर्ण जळून गेल्यावर जिम रुग्णाला म्हणाला. “मित्रा, ज्या भुताने तुला पछाडले होते ते गेले. परमेश्वरकृपेने तू पूर्ण मुक्त झाला आहेस. दार उघडून जिमने त्या रुग्णाला व्हील चेअरवरून त्यांच्या खोलीत आणले, त्याला अंथरुणावर झोपवले. हा विधी चालू असताना एकूण वातावरण अतिशय गंभीर, गूढ व त्याला एक अमानवी स्वरूप प्राप्त झाले होते. ही भूतबाधा नष्ट करण्याच्या विधीचा लगेचच परिणाम झाल्याचे दिसत होते. जो रुग्ण घासभर अन्नही नाकारत होता, त्याने नेहमी दिल्या जाणाऱ्या बेचव नाष्ट्याची दोनदा मागणी केली व जेवणही जे काही पुढे येईल ते तो फस्त करत होता. त्याचे वजन भराभरा वाढू लागले. त्या रुग्णाला ह्या विधीचा कोणाजवळ उल्लेख न करण्याबद्दल जिमने सांगितले होते. हे गुपित त्या वृद्धाने पूर्ण गुप्त ठेवले. तो आनंदी, उत्साही झाला. त्या रुग्णाला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून घेऊन हा परिणाम पूर्णत्त्वाने यशस्वी झाला आहे किंवा नाही ही त्याला खात्री करून घ्यावयाची होती. जेव्हा त्याची तशी खात्री झाली तेव्हा त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
 ही गोष्ट वैद्यकशास्त्राच्या कोणत्याही नियमात नाही. उत्कृष्ट पद्धतीने तपासण्या करूनही त्या रुग्णात विकाराचे कोणतेही चिन्ह नव्हते. तरीही शरीराचे अणू (पेशी) त्यांचे कार्य नीट करत नव्हते. विज्ञानामध्ये कोणत्याही वस्तूवर तोच प्रयोग केला तर तोच परिणाम आढळतो. मग वैद्यकशास्त्रातच न समजणाऱ्या अशा अनंत गोष्टी कशा घडू शकतात? येथे कोणती शक्ती कार्य करते? मनाची अपरंपार शक्ती, तिचे अस्तित्व व मनाची सर्वव्यापकताच यातून निदर्शनास येत असते. “मन है चंगा तो कथवट में गंगा”, श्रद्धा अपार असेल तर साध्या पाण्याचेही अमृत बनते, तीर्थ बनते, राखेचा अंगारा होतो व अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. हिलाच सामान्य माणसे ईश्वरकृपा, वरदान असे समजतात. अशा गोष्टींचे कारण विज्ञानावाटे समजू शकत नाही, ते असते अध्यात्मामध्ये, आपल्या आत्म्याच्या शक्तीमध्ये.
विज्ञान, वैद्यक आणि सत्य :
 आपणच नव्हे, सर्वच विद्वान लोक असे मानतात की, विज्ञानामध्ये कोणत्याही वस्तूवर तोच प्रयोग केला तर तोच निष्कर्ष निघतो. पण यालाही काही दुसरी बाजू १२८