पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळणारे निष्कर्ष दोन वैद्य वेगवेगळे काढतात. यालाही कारण या दोन वैद्यांच्या दृष्टिकोनातील फरक. एखाद्या वस्तूची आकृती जेव्हा आपल्या नेत्रावाटे मेंदूवर उमटते तेव्हा ती उमटलेली आकृती सर्व व्यक्तींच्या बाबत बरोबर तशीच उमटावयास पाहिजे. पण तसे होत नाही. पुष्कळ वेळा आपले मन ठरविते तशीच आकृती आपल्याला भासू लागते. समजा, आपण निर्जन घनदाट जंगलातून चाललो आहोत. या वनात सर्व प्रकारचे प्राणी आहेत परंतु आपण वाघ पाहण्यासाठी आलो आहोत.अशा वेळी आपले मन पूर्णपणे वाघ या प्राण्यावरच केंद्रित झालेले असते.अशा वेळी गवतात झाकलेला एखादा लाकडाचा ओंडकासुद्धा वाघाचे रूप घेतो.तो वाघ प्रत्यक्ष आपल्याला दिसत असतो. अनेक वेळा वैज्ञानिकांचे सुद्धा अगदी हेच होते.ते मनात एक संकल्पना ठरवितात. प्रयोगात जसजसे दिवस जातात तसतशी त्यांची तादात्म्यता वाढत असते. अशा वेळी प्रत्यक्ष सत्य निष्कर्षाऐवजी चुकीचा निष्कर्षही सत्य भासू लागतो. कंसाच्या मनात श्रीकृष्णाविषयी अपार भीती होती. त्यामुळे त्याला जळी, स्थळी, काष्ठी श्रीकृष्णच दिसत असे. त्या वेळी श्रीकृष्ण प्रत्यक्ष तेथे उपस्थित नसताना हे घडत असे. याच्या उलट त्याच्यावर अपार प्रेम करणाऱ्या गोपी, गोप यांना ते स्वतः अनेक वेगवेगळ्या ठिकाणी असूनही श्रीकृष्ण आपल्याबरोबर आहे, खेळतोय, बासरी वाजवतो आहे, अशी प्रत्यक्ष प्रचीती येत असे. याचे कारणच त्यांची मने एका विषयाशी तादात्म्य पावली होती.
 अगदी अशीच गोष्ट विज्ञानामध्येही होत असते. मुळात जेव्हा शरीर हे एक यंत्र आहे अशी संकल्पना मांडून तिच्याविषयी विचार सुरू होतो तेव्हाही प्रत्यक्ष सत्य कधीच आपल्या पदरात पडत नाही. यामुळे शरीराची प्रत्येक प्रक्रिया ही गणिती पद्धतीने मोजता येणे शक्य आहे असे गृहीत धरले जाते. ही संकल्पना मुळातच कशी निर्माण झाली? मृताच्या शवविच्छेदनातून मानव कळतो, त्याची शरीररचना कळते ती पदार्थविज्ञानशास्त्रांच्याच नियमाधारे. एखादा दगड, लाकूड, माती यांचे आपण सहज पृथक्करण करून त्याची रचना, त्याचे अणू हे आपण जाणून घेतो तोच नियम मानवाला लावला जातो. ही बाब आपण वेगळ्या स्तरावर पाहू. १० नोव्हें. १६१९ रोजी देकार्त हा फक्त विशीत होता. त्याला एक दिवस साक्षात्कारी विचार सुचला की या विश्वाची चावी त्याच्या रेखीव आखणीमध्ये अस्तित्वात आहे. यालाच आपण पूर्णतावादी (Perfectionist) म्हणतो. हा आखीव-रेखीवपणा १३०