पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे परिपूर्णता, निर्दोषत्व. या संकल्पनेमुळे विश्वाचे कोणते चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल? ते असे की, हे विश्व म्हणजे अनेकानेक भागांची निर्दोष जोडणी करून त्याच्या प्रत्येक भागाची हालचाल, गती ही अतिशय काटेकोर गणिताचे नियम लागू होणारी अशी पूर्णत्वाची रचना आहे. सर ऐझॅक न्यूटन हा देकार्तच्या नंतरच्या पिढीतील एक अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ. न्यूटनने या घड्याळानुसार चालणाऱ्या वैश्विक हालचालींचा आकृतिबद्ध नकाशा तयार केला. त्यातील अतिशय साधेपणा व हालचाली यांच्यासंबंधी काही शास्त्रीय नियम मांडले. यामुळे त्यांची भविष्यकाळातील विशिष्ट दिवस, विशिष्ट वेळी या भागांची स्थिती ही नैसर्गिकपणे कशी असेल याची पूर्वकल्पना सहज येऊ शकते. यातील भाग हा शब्द ग्रह, तारे आदी दर्शक आहे.
शरीर : एक यंत्र :
 देकार्त हा अत्यंत तरल बुद्धीचा विद्वान. त्याने ह्या विश्वाच्या रचनेची, त्याच्या भागांची रचना, मांडणी व हालचाली यासंबंधी ज्या संकल्पना मांडल्या त्यांना बुद्धिवादाची, वैज्ञानिक अभ्यासाची व आखीव-रेखीव विचारांची जोड होती. मनुष्य हाही विश्वरचनेचाच एक भाग परंतु तो किती छोटा आहे हे डिकसन याने सांगितले होते. तो म्हणतो, "आपण कल्पना करू या की हे बटाट्यांनी गच्च भरलेले पोते आहे व त्यातील एका बटाट्यात सूक्ष्म जीवाणू आहे. त्या बटाट्याच्या पोत्यातील हा जीवाणू पोत्याशी तुलना करता किती छोटा आहे? हीच स्थिती मानवाची आहे." असे पोते म्हणजे एक ग्रह. असे अनेकानेक ग्रह व तारे म्हणजे एक गॅलेक्सी/ आकाशगंगा. आणि अशा अगणित आकाशगंगा म्हणजे विश्व. त्याची आजची आपली माहिती अगदी कोती आहे. आपले विश्वाशी तुलनात्मक छोटेपण, त्यातील पंचमहाभूतांचाच घडलेला हा देह म्हणजे मानव. पण या मानवाला बुद्धीची प्रचंड शक्ती लाभलेली आहे. देकार्तच्या धारणेप्रमाणे "मानव हा दोन भागांचा बनलेला प्राणी आहे. एक भाग म्हणजे देह वा काया व दुसरा भाग म्हणजे मन. देहाचा मनावर परिणाम होतो पण मनाचा देहावर नाही. याला मूलाधार म्हणजे विश्वाची आखीव-रेखीव रचना व तिचे नियम. मानवसुद्धा असा नियमांनीच बांधलेला आहे. देहाची क्रिया नियमबद्ध आहे, तशी मनाची नाही. मनाला व त्याच्या कार्याला काहीच नियम लागू शकत नसल्यामुळे मनाची वैश्विक भाग असण्याची कल्पना १३१