पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विवेकबुद्धीला पटणारी नाही व त्यामुळे ती विज्ञानामधून बाद केलेलीच बरी." ही संकल्पना देकार्तच्या वैश्विक कल्पनेशी जुळणारी होती, विवेकी होती पण त्यात सत्यता किती होती? हे कार्टेशिअन तत्त्वज्ञान जर पाहिले तर त्याप्रमाणे मनुष्याचे शरीर हे एक यंत्राप्रमाणे वैश्विक नियमबद्ध असलेले एक प्रतिबिंबच आहे. याच विचारातून विकार म्हणजे शरीराच्या यांत्रिकपणात झालेला बिघाड अशी धारणा निर्माण झाली. पूर्वी शरीरविच्छेदनाला असणारा धार्मिक विरोध चर्चने मागे घेतला. शरीर व मन ही जर वेगळी असतील तर शरीर- विच्छेदनामुळे त्याच्या आत्म्याला काहीही धक्का पोहोचणार नाही. मग त्याला धार्मिक विरोध कशासाठी करावयाचा? ह्या पूर्वीच्या धार्मिक बंधनातून मुक्तता मिळाल्यामुळेच पाश्चात्य वैद्यक म्हणजे शरीरशास्त्राचे ज्ञान व या यांत्रिक ज्ञानातून केली जाणारी रोगचिकित्सा व त्याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न. अशा या संकल्पना म्हणजे आधुनिक वैद्यकाचा पायाच आहे ही गोष्ट गृहीत धरून आधुनिक वैद्यकात प्रगती होत राहिली. ही प्रगती पूर्वीही एकांगीच होती व आजही त्यात भारतात बदल झालेला दिसत नाही.
 या गोष्टीत बदल घडण्यास वा घडविण्यास नेहमी विरोधच होत आलेला आहे. विज्ञानाची साधीसुधी व्याख्या काय? लिओनार्डो म्हणतो, "विज्ञान म्हणजे निरीक्षणातून मिळालेले ज्ञान, वैश्विक सत्यता नाही. जो कोणी असे अधिकारवाणीने म्हणेल तो आपली बुद्धी वापरण्यापेक्षा जुन्या मतांच्या आठवणीच सांगत असतो." नवीन गोष्टीसुद्धा निरीक्षणामधूनच कळत असतात परंतु निरीक्षणे बुद्धिवादा तपासून घेतल्यावर नवीन ज्ञान मिळत असते, स्वतःला पूर्वमताच्या खोट्या अभिमानाने बांधून घेऊन नव्हे. आपले तत्त्वज्ञान, आयुर्वेदाची निर्मिती या सर्व गोष्टी निरीक्षण, अनुभूती, मनन व चिंतन यातूनच निर्माण झाल्या व वर्धित होत राहिल्या. परंतु तो प्रवाह पुढे खुंटला. जेत्यांच्या आधुनिक विज्ञानाच्या चकाकणाऱ्या अस्तित्वापुढे आपल्या संथ, मंद अशा पद्धतीची पीछेहाटच झाली.
'कालोह्यहं निरवधि:' - काल आणि कालमापन व व्यक्ती :
काळ म्हणजे काय? याची सुरुवात कोठे झाली व त्याला अंत आहे का? तो कसा मोजावयाचा? भूत, वर्तमान व भविष्य या काळाच्याच अवस्था आहेत का ? विश्वात जे बदल घडत असतात, किंवा आपल्या देहात जो कालानुसार न्हास होत १३२