पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतो असे आपण म्हणतो, त्याचा काळाशी प्रत्यक्ष संबंध किती? असे हजारो प्रश्न जुन्या विचारवंतांच्या पुढे येत होते व त्यांच्या त्यांच्या चिंतनामधून मिळालेली माहिती त्यांनी व्याख्यारूपाने लिहून ठेवली आहे व त्यालाच आपण पूर्णसत्य मानत आलो आहोत. हा संभ्रम आपल्या प्राचीन विद्वानांना पडला होता व त्यांनी चिंतन, मननातून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना सापडलेली उत्तरे त्यांनी तत्त्वज्ञानात लिहून ठेवलेली आहेत. असाच संभ्रम पाश्चात्य धर्मगुरूंनाही पडला होता. त्यांतील एक विद्वान धर्मगुरू म्हणतो, “जोपर्यंत या अर्थाचा प्रश्न मला कोणीही विचारत नाही तोपर्यंत मला विश्वास वाटतो की ह्याचे मला ज्ञान आहे. पण जर एखाद्या भाविकाने हा प्रश्न विचारला, तर त्याला समाधानकारक उत्तर मजजवळ नाही. ओघानेच त्याचे मला विवेचनही करता येणार नाही." काळाची एकमेव व्याख्या करता येत नाही कारण त्याबद्दल प्रत्येकाची जाणीव व कल्पना वेगवेगळ्या असतात, मोजमापाच्या वैयक्तिक फूटपट्ट्या असतात. एखादा खगोल-शास्त्रज्ञ, वैद्यक व्यावसायिक, गृहिणी आणि नोकरदार ह्यांच्या वेळा वेगळ्या असतात. कॅलेंडरप्रमाणे, काळ स्वयंपाक केव्हा करावा हे सांगणार नाही. एखादा तीर्थयात्रा करणारा साधू व प्रयोगशाळेत काम करणारा संशोधक यांच्या कालसंकल्पना वेगळ्या असतात. आपण ज्याला वेळ किंवा काळ म्हणतो तो आपापला अनुभव असतो. तोच दिवस किंवा तोच काळ एखाद्याला वर्षासारखा भासेल तर एखाद्याला काही मिनिटांचा भासेल. तरुणाला आठ तासांची झोपही कमी वाटू शकेल तर वृद्धाला पाच-सहा तासांची झोप दीर्घ वाटेल. एक म्हणेल रात्र संपत नाही तर दुसरा म्हणेल दिवस किती लवकर उजाडला. असे असूनही आपण म्हणतो की, वेळाचे मोजमाप करता येते व सर्वांचा काळ समानच असतो. निकोल्सने १८९१ साली असे म्हटलेले आहे की-
 “काळ हा एखाद्या धर्मस्थळासारखा (Priori) आहे. तो नैसर्गिक (किंवा ईश्वरदत्त), अंतःस्फूर्तीने जाणला जाणारा, अनुभवावर आधारित व यांत्रिक आहे. तो तर्काने - अंतरीच्या वा बाह्य - जाणून घेता येणारा, किंवा त्रिखंडातून येणारा वा पृथ्वीवरील, असा अनेक अस्पष्ट, अनाकलनीय प्रकारचा आहे." एका पाश्चात्य तत्त्ववेत्त्याने असे म्हटले आहे. 'आपल्याला कमीतकमी चार प्रकारचे काळ अनुभवास येतात. आपली काळाची जाणीव गोंधळ निर्माण करते. याचे खरे कारण - १३३ 66