पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे आहे की आपला काळाचा हिशोब करण्याचा उद्देश सुस्पष्ट नसल्यामुळे त्याच्या मापनाची आपली पद्धतही सुस्पष्ट, सरळ अशी नसते. कालमापनाच्या अनुभूतीचे चार प्रकार सांगता येतील. ते असे.
 (१) वर्तमान काळ - संक्षिप्त कालखंड (कालखंडाचे छोट्या छोट्या भागांचे आकलन व काळाची तालबद्धता. आठवणींचा कालखंड)
 (२) भूतकाळाची दीर्घकालीन आठवण त्या काळाची लांबी.
 (३) अल्पकालीन वा क्षणभंगूर - तत्त्वज्ञान, समाजशास्त्रीय, संस्कृतिनिर्मिती व त्याचे कालमापकासंबंधी अर्थ जाणणे, वगैरे. भविष्य काळ.
 (४) समकालीनता व अनुक्रम.
या चार प्रकारांत आपली काळ कंठण्याच्या अनुभवाची जाणीव होते.
 ही झाली भूतकालीन संकल्पना. परंतु आजही ती लागू पडते. परंतु ती थोडी क्लिष्ट वाटते. इजिप्शिअन विद्वानांनी एक अतिशय सोपी पद्धत शोधून काढली. हे त्यानुसारचे पंचांग. एक वर्ष म्हणजे बारा महिने. प्रत्येक महिना तीस दिवसांचा. कालमापनाचा हा मार्ग त्या वेळी त्या लोकांनी कैरोजवळ नाईलला जेव्हा पूर येत त्यांचे निरीक्षण करून अनेक वर्षांची सरासरी काढून ठरविला. वर्षाच्या अखेरीस त्यात पाच दिवस मिळविण्यात येऊन वर्ष ३६५ दिवसांचे झाले. आपल्याकडेही समकालीन असे पंचांग निर्माण करण्यात आले. आपले वर्ष ३६० दिवसांचेच परंतु हा पाच दिवसांचा फरक 'अधिक' मास घालून काढण्यात आला आहे. या सततच्या निरीक्षण व अनुभवातूनच ऋतू, त्या त्या काळातील ग्रह-ताऱ्यांची स्थिती, भरती- ओहोटी, शुक्ल आणि कृष्ण पक्ष, पौर्णिमा आणि अमावास्या यांचे दिवस अशी कालचक्राची साखळी निश्चित करण्यात आली. वर्षाच्या ऋतुमानाच्या बदलानुसार सणवार निर्माण झाले. या पंचांगानुसार शेतीची पेरणी, काढणी ह्यांचे चक्रही ठरविले गेले. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे कालचक्राचे भाग म्हणजे ऋतू ठरविले गेले.फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक,मार्गशीर्ष, पौष व माघ हे बारा मास तर प्रत्येक दोन महिन्यांचा एक ऋतू असे सहा ऋतू ठरवले गेले. ते सहा ऋतू असे. - १३४