पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वापर करून वेळ ओळखत असत. सकाळी दक्षिणेकडे तोंड करून सूर्य डाव्या बाजूस घ्यावयाचा, डावा तळवा जमिनीला समांतर धरून उजव्या हाताची मूठ अंगठा ताठ करून डाव्या हातावर ठेवावयाची. या अंगठ्याची हातावर जी सावली पडते त्यावर दुपारी १२ वाजेपर्यंतची वेळ सांगता येते, बारा वाजता सावली पडत नाही.दुपारी याच्या उलट करावयाचे. यानुसार तास निश्चित समजतात. परंतु अर्धा तास, पाव तास यासाठी मात्र खूप अनुभवाची गरज असते. काळ हा सरळ रेषेत प्रवाहासारखा जात असतो हे सिद्ध झालेले होते. परंतु तो निश्चित कसा मोजावयाचा हे समजत नव्हते. याला उत्तर 'हायजेन'ने (Huygen) लंबकाचे घड्याळाचा शोध लावून दिले. आता आपले जीवन घड्याळाशी इतके निगडीत झाले आहे की जणू आपण घड्याळाचे गुलाम झालो आहोत. हळूहळू या घड्याळात सुधारणा होत होत नुसते तासच नव्हेत तर मिनिटे, सेकंद, वार, तारीख, महिना अशा अनेक तपशिलांची त्यात नोंद आढळते. भिंतीवरील, नंतर गजराचे, मनगटी व अगदी अंगठीत बसवलेले अशी घड्याळे आली आहेत. कालनिदर्शन व सौंदर्य यांचा त्यांत संगम झालेला आढळतो.
 ह्या घड्याळाच्या गुलामगिरीला विरोध करणारेही लोक आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण पूर्वी निसर्गाचे घड्याळ बघावयाचो व पाळावयाचो. स्वतः- करिता आपल्या शरीरात जे नैसर्गिक घड्याळ आहे, त्यानुसार वागावयाचो. निसर्गतः : आपल्याला भूक ठराविक वेळी लागते, झोप ठराविक वेळी येऊ लागते, जागही ठराविक वेळी येते. हे घड्याळ ज्या वेळी यांत्रिक घड्याळे आली नव्हती त्या वेळी उत्तम काम करत असे. त्यामुळे आपले आरोग्यही उत्तम राहत असे.औषधे म्हणजे निसर्गात मिळणाऱ्या गोष्टी वापरून विकार दूर करावयाचा. रोगांच्या साथी आल्या की हजारो लोक मरावयाचे. परंतु ही लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याची निसर्गाची रीत होती. जंगलामध्ये एक निसर्गाचा नियम स्पष्ट आढळतो. त्यातील अकाली मृत्यू होतात ते तो तो प्राणी अशक्त असतो म्हणून. शाकाहारी प्राणी मांसाहारी प्राण्यांचे बळी ठरतात ते अशक्त असतात. वाघ, सिंह, कोळशिंदे ( रानकुत्रे) जे प्राणी मारतात ते सर्व अशक्त असतात. उन्हाळा सुरू झाला, अन्न व पाणी मिळेनासे झाले की शाकाहारी प्राणी स्थलांतर करतात. हे प्राणीच अन्न असल्यामुळे मांसाहारी प्राणीही त्यांच्या पाठोपाठ स्थलांतर करतात. त्या १३६