पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माकडिणीची गोष्ट माहीत आहेच. पाणी हळूहळू वाढू लागले तसतशी पोराला खांद्यावर घेऊन तेथील खांबावर ती चढू लागली. जेव्हा पाणी तिच्या नाकात शिरू लागले तेव्हा ती आपले पोर आपल्या बुडाखाली घालून त्यावर बसली. ही कहाणी प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे हे दाखवण्यासाठी लिहिली गेली आहे. परंतु त्यातले तत्त्व नैसर्गिक सत्य आहे. जंगलात स्थलांतर करताना अनेक प्राण्यांचे,अगदी सिंहाचे सुद्धा बच्चे आपल्या कळपाबरोबर जाऊ शकत नसतील तर माद्या त्यांना मदत करतात. पण जेव्हा स्वतःच कळपापासून मागे राहण्याची वेळ येते तेव्हा त्या पिल्लांना मागे सोडून निघून जातात. ही पिल्ले निश्चित मरणार आहेत हे त्यांना माहीत असते. स्वतः प्राणपणाने पिल्लांचे रक्षण करणाऱ्या माद्याच असे वागतात हे पाहून आश्चर्य वाटते. यात सिंह व हत्तीसारखे प्राणीसुद्धा मोडतात. हे वागणे दर्शनी क्रूर वाटले तरी अंती तो निसर्गाचा नियम आहे, व प्राणी तो पाळतात.
 मानव मात्र याला अपवाद आहे. पूर्वी लोकसंख्यावाढीवर निसर्गच साथी,दुष्काळ, युद्धे अशा संकटांनी नियंत्रण ठेवत होता. ते नियंत्रण विज्ञानाच्या प्रगतीमुळे गेले. परंतु त्याची जागा दुसऱ्या चांगल्या मार्गाने घ्यावयास पाहिजे होती. ती आली नाही. यामुळे लोकसंख्या अफाट वाढली. लोकांची गरिबी वाढली व मनुष्याचे जनावर झाले. कीटक मारण्यासाठी औषधे आली आणि त्याबरोबर कीटक खाणारे प्राणीही मेले. अशा अनेक गोष्टी हे सांगतात की जसजसे आपण निसर्गापासून दूर जातो आहोत तसतसे आपले जीवन सुखी होण्याऐवजी दुःखीच होत चालले आहे. या विषयावर अनेक विचारवंतांनी आवाज उठवला आहे पण ते शेवटी अरण्यरुदनच ठरले आहे. आपण आज घड्याळाचे गुलाम झालो आहोत. घड्याळ आपण केव्हा जेवण करावे, केव्हा उठावे अशा आज्ञा देत असते. आपण गजर लावून जागे होतो ते घड्याळ हुकूम करते म्हणून. ही स्थिती विचारवंतांच्या मनात भविष्याची भीती निर्माण करत आहे. याचे एक विडंबन करणारी कहाणी वाचनात आली. अमेरिकेत तेथील एक नृत्य करणारा आदिवासी होता. हा आदिवासी नृत्ये रंगमंचावर करत असे. त्याने आपल्या पायांना एक गजराचे घड्याळ बांधले होते. नृत्य करता करता गजर झाला की म्हणे, "माझी जेवणाची वेळ झाली, मी जेवतो", "माझी झोपण्याची वेळ झाली, मी झोपतो" असे म्हणून तो नाच थांबवत असे व परत थोड्या वेळाने नाच सुरू. ही त्याची आपली स्वतःची घड्याळाच्या गुलामगिरीवर १३७