पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतो. ही मानसिकता म्हणजे काय ? ती स्थिती दर्शवितात भावभावना. या सकारात्मक असतील तर ही कारणपरंपरा निर्माणच होत नाही व नकारात्मक असेल तर 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' हमखास येत असतो. या भावना म्हणजे आशा, आनंदी वृत्ती या सकारात्मक तर दुःख, निराशा, अपयश व जबर ताण या नकारात्मक भावना. यांना आपल्या तत्त्वज्ञानात षड्रिपू म्हटलेले आहे. काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी प्रत्येक भावना म्हणजे ती अतिरेकी झाल्यावर त्यांचा देहावर अतिशय विपरीत परिणाम होत असतो. अतिरिक्त 'कामा'तून अनेक लैंगिक रोग निर्माण होतात. अतिक्रोधामुळे रक्तदाब अतिशय वाढून त्यातून स्ट्रोक, हृदयविकाराचा तीव्र आघात, अर्धांग अशा विकारांचा प्रादुर्भाव होतो. या सर्वांना नकारात्मक भावनांचेच विकृत रूप असे म्हणता येईल.
 आपण आज प्रत्येक रोगावर औषधोपचारातून मुक्ती मिळवू इच्छितो. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च औषधसंशोधन यावर होत असतो. कॅन्सर, हार्टडिसीज यांवर किंवा यासारख्या अनेक विकारांपासून आपण औषधोपचार, शस्त्रक्रिया यासारख्या बाह्योपचाराद्वारे मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. एडस्वर अद्यापही आपणाकडे औषध नाही. याचा अर्थ एवढाच की फक्त देहावर लक्ष केंद्रित करून कधीही आरोग्य मिळणार नाही. त्या रोगांची कारणपरंपरा ही मनुष्याच्या मानसिकतेमध्ये असते. चांगल्या व वाईट भावभावना यावर चांगले किंवा वाईट परिणाम करत असतात. हेच इंग्रजीमध्ये 'ह्यूमन फॅक्टर्स' (Human Factors) म्हणजे विकारांना जन्म देणारे, वाढवणारे असे किंवा विश्वास बसणार नाही अशी विकारमुक्ती मिळवून देणारे सहायक घटक आहेत. ही जी एका शब्दात आपण मानसिकता म्हणून ओळखतो त्याच्या परिणामांच्या अनंत कथांची नोंद संशोधकांनी करून ठेवली आहे.
 तैलपदार्थ व प्रत्यक्ष कोलेस्टरॉल (हे प्राण्यांच्या चरबीमध्ये असते, वनस्पतिजन्य तेलात नसते) यांचा मानवाच्या रुधिराभिसरणावर काय परिणाम होतो हे काही संशोधक सशांवर प्रयोग करून पाहत होते. त्यांनी काही दिवस सशांना हे पदार्थ दिल्यावर नंतर तपासणी केली. त्यात असे आढळले की काही सशांवर त्याचा निश्चित परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला होता, तर त्यांतील काही सशांच्या रोहिण्यांमधील कोलेस्टरॉल फारसे चोंदलेले नव्हते. तर काहींचे बाबत त्यांच्या १४८