पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोडले (औषधरूपाने) तर या पेशींचे कार्य सुधारते. परंतु तसेच रासायनिक अणू जोडीदार गमावलेल्या व्यक्तीच्या शरीरात घातले तर त्या पेशी त्याला काहीही प्रतिसाद देत नाहीत. जणू या पेशी स्वतःच आजारलेल्या होत्या. हे का व कसे घडते? जोडीदार गमावणे ह्या गोष्टीचा जिवंत जोडीदारावर प्रचंड मानसिक ताण येतो. पण त्याचा मानवाच्या प्रतिकारक्षमतेवर एवढा परिणाम होऊ शकतो का ? हे उत्तर मिळणे फार कठीण आहे. याची कारणे मोठी गुंतागुंतीची आहेत व त्यांचा मेंदूच्या रासायनिकतेशी संबंध असावा. श्लेफर म्हणतो की, आजार हा ह्या जोडीदारांनी वाटून घेतला असावा. आपला स्वतः चा मृत्यूसुद्धा एकट्याचा नसतो. हा मृत्यू आपल्यावर मनोभावे प्रेम करणाऱ्यांच्या मनात एक प्रचंड वादळ निर्माण करत असतो. आता हे कबूल करावयास पाहिजे, सर्वसामान्यांसाठी आरोग्य व आजार ह्या गोष्टी पूर्णपणे व्यक्तिगत असतात. परंतु वर मिळालेले अनुभव ध्यानात घेतले तर ही संकल्पना बरोबर नाही हे सहज ध्यानात येते. मानवा - मानवामधील संबंध ही काल्पनिक कहाणी नाही. आणि एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणारे तर हे संबंध फारच दृढ करतात. 'आभाळमाया' ह्या दूरदर्शनवरील मालिकेतील जया म्हणतो की " मी बेटासारखा एकटा आहे". हे अगदी असत्य आहे. कोणीही माणूस बेट नसतो, त्याला तसे जगताच येणार नाही. जीवनात जसे मानवी संबंध अटळ असतात, तसेच ते मृत्यूमध्येही असतात.
 जॉन हा पासष्ट वर्षांचा वृद्ध रुग्ण हृदयविकारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याला छातीत दुखू लागल्यामुळे इस्पितळात आणले होते. त्याची तपासणी केली असता असे आढळते की त्याच्या रुधिराभिसरणात दोष असल्यामुळे हे होत होते. पाय, मस्तक व हृदय यांना रक्तपुरवठा करणाऱ्या शुद्ध रक्तवाहिन्यांत अडथळे होते. इ.सी.जी. मध्ये एम्.आय. (Myocardinal Infarction) म्हणजे स्नायुपेशी मृत होणे हे आढळून आले. हे इंफार्शन बऱ्याच विस्तृत भागावर होते. जॉन हॉस्पिटलमध्ये ज्या दिवशी दाखल झाला त्याच्या तिसऱ्या दिवशी एक नवीन केस श्वास कोंडू लागल्याने दाखल झाली होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो रुग्ण म्हणजे जॉनची पत्नीच होती. ती छाती पकडून बसली होती. चेहरा पांढरा, रक्तहीन. तिलाही त्याच स्पेशल वॉर्डात नेली. काही काळाने तिची प्रकृती स्थिर करण्यात डॉक्टरांना यश आहे. पण तिला एम्. आय. चा आघात झाला होता. म्हणजे जॉन व १५४