पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याची पत्नी या दोघांनाही हृदयविकाराचा आघात लागोपाठ झाला. याचा अर्थ आपल्या पतीच्या आजारात पत्नीनेही आपला वाटा उचलला. अशा हकीकती काही अपवादात्मक नाहीत. फक्त कागदोपत्री नमूद झाल्या नसल्यामुळे त्या चकित करणाऱ्या भासतात. एक जोडीदार मेल्यावर दुसराही मृत्युमुखी पडतो असे घडलेले आहे.
विकारातील मानवी सहभागाचे तत्त्व :
 मानवाला त्याच्या अस्तित्वासाठी, तसेच सुखी व ताणरहित जीवनासाठी निरनिराळ्या आधारांची जरूर असते. त्यांत समाज, प्रेम करणाऱ्या व्यक्ती, काळजी घेणाऱ्या व काळजी करणाऱ्या जवळच्या व्यक्ती, एकमेकांवरील विश्वास अशा अनेक घटकांची जरुरी असते. ह्या तत्त्वांना बायॉलॉजिस्टांच्या कोशात काहीही स्थान नाही. हे शास्त्रज्ञ कोठल्याही विकारांची कारणपरंपरा फक्त शरीरशास्त्रामध्ये शोधत असतात. परंतु त्यातील मनाचा सहभाग किती मोठा असतो ते त्या शास्त्रातच नाही. यात नुसते मानवीच नव्हे तर एकूण प्राणीमात्रांच्या संपूर्ण जीवनाचा सर्वार्थाने विचार होत नाही. या संबंधात एक पाश्चात्य तत्त्वज्ञानी म्हणतो -
 “एखादी व्यक्ती समाज व कुटुंब यापासून पूर्ण फुटून पूर्णपणे स्वतंत्र जगू शकते हा विचार फक्त काल्पनिक असतो. जगात अशी एकही व्यक्ती अस्तित्वात नाही. प्रत्यक्षात जवळ जवळ सर्व प्राणीमात्र, आपले जीवन समाजाशी एकरूपपणे जोडलेले आहे आणि ही गोष्ट व्यवहारात आणण्यासाठी एकमेकांचे सहकार्याची जरुरी असते, हे जाणतात. या गोष्टी वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करण्याची काहीच जरुरी नाही कारण त्या प्रत्यक्ष अनुभवास येतात. इतिहास पाहिला तर अगदी आदिम काळापासून प्राणीमात्रांची ही वर्तणूक स्पष्ट आढळून येते. आपले आरोग्य आणि सामाजिक निकोप संबंध ही एकमेकांशी अत्यंत निगडीत आहेत. इतर आनुवंशिक जन्मजात गुणाप्रमाणेच हाही गुण आनुवंशिकच आहे. आपल्या जीवनाला एक पद्धत आहे, एक जन्मजात नमुना आहे, जो पिढ्यान् पिढ्या पुढे चालत असतो. मग आरोग्यावर परिणाम करणाऱ्यामागे चर्चा केलेल्या निरनिराळ्या घटकांचा वेगवेगळा, अगदी स्वतंत्रपणे विचार करणे चुकीचेच ठरेल. आणि आनुवंशिकता हा घटक तरी अंतिम आहे का? पेशीमधील जीनचा तो एक घटक आहे. तेव्हा त्याचे स्वतंत्र मूल्यमापन १५५