पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतो. हे सत्य असले तरी आपण व्यवहारात याचा वेगळा अर्थ लावतो. 'मी' हा जन्मजात स्वतंत्र आहे असा अहंभावही जन्मजात असतो. यामुळे इतर मनुष्यांपेक्षा मी वेगळा आहे. जन्मत: जीन्समध्ये थोडाफार फरक असला तरीही मानव म्हणजे आपल्या पूर्वजांचे प्रतिबिंब आहे ही धारणाच जेव्हा नष्ट होते, तेव्हा ह्या गोष्टीचा थोडा खोल विचार करण्याची जरुरी निर्माण होते. पती व पत्नीच्या शारीरिक संबंधातून जे अपत्य जन्माला येते त्याला पित्याकडून ५०% व मातेकडून ५०% जीन्स मिळत असतात. पुढल्या पिढीत ते याच्या निम्मे होतील. असे ते मूळ जीन्स कमी होत होत आज घटकेला त्यातील मूळ जीन्स जवळजवळ शून्य झाले असे गणिताने म्हणावे लागेल. म्हणजे १०-२० पिढ्यांमध्ये हे प्रमाण शून्यावर येईल. परंतु निदान एका पिढीत तरी हे निश्चित स्वरूपात असतात हे सत्य आहे. त्यामुळे त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यभरापुरते तरी हे सत्य आहे व त्यामुळे जो अहंभाव निर्माण होतो तो जन्मजात असतो. कारण जीन्स म्हणजे जणू त्या जीवाचा जीवशास्त्रीय आराखडाच (Blue Print) असतो. परंतु आपले जीन्स सतत नवीन जीन्स निर्माण करून त्याचे प्रतिबिंबवजा नवीन जीन्स निर्माण करत असतात. जीन्सचा मूलभूत घटक म्हणजे डी. एन्. ए. हा अणू तसा अल्पजीवी असतो. याचा व्यावहारिक अर्थ असा की एक वर्षाच्या कालखंडानंतर एकही मूळ जीन अस्तित्वात राहत नाही.
 परंतु जीन्सचा नमुना तोच कायम असतो व तसाच तो हजारो नव्हे लाखो वर्षेसुद्धा बदलत नाही. याला अपवाद म्हणजे 'म्युटेशन' (Mulation). सर्वसाधारण नियम असा की पुढील पिढी निम्मे पित्याचे व निम्मे मातेचे जीन्स घेऊन जन्माला येत असते. परंतु जेव्हा एखादे अपत्य काही निराळेच जीन्स घेऊन जन्माला येते, तेव्हा त्याच्या शरीरात, रूपात बदल होत असतो. हाच वंशबदल. मूळ बिनशेपटीच्या माकडापासून आजचा मानव तयार झाला. मूळ लांडग्यापासून आजचे अनेक जातींचे कुत्रे तयार झाले. कोल्हेही त्याच जातीचे. हे जे वंशबदल होत असतात ते जीन्सच्या बदलामुळे. परंतु या गुणसूत्रांचे मूळ घटक म्हणजे कार्बन, हैड्रोजन, ऑक्सिजन यांचे व असेच इतर हजारो अणू. आपण सातत्याने 'मी', माझेपण, हा जो अहंभाव बाळगत असतो, त्याचा पायाच इतका ठिसूळ आहे की त्याला पाठिंबा देणे वा मिळवणे शास्त्रीयदृष्ट्या १५७