पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
देह-मन-संबंध



 देह-मन-संबंधाच्या भारतीय संकल्पना वेद, उपवेद, उपनिषदे, गीता यांचा आढावा आपण घेणार आहोत. एकूणच भारतीय व इतर तत्त्वज्ञानाचे विहंगावलोकन आपण करणार आहोत. यात फक्त मानवाचे बाबतीच देह-मन-संबंधाचा विचार नसून तो वैश्विक स्तरावर करण्याचा प्रयत्न आहे. या पृथ्वीवर असंख्य जीव आहेत.मानव हा प्राणीसृष्टीपैकी एक प्राणी आहे. तेव्हा त्या प्राण्यांचे मन व आपले मन एकच आहे का? का वेगळे आहे? प्राण्याप्राण्यामधील मानसिक संबंध कसे असतात हे तत्त्वज्ञानात स्पष्ट सांगितले आहे. परंतु त्यात सत्य किती व मिथ्या किती? याला काही मोजमापे लावता येतील का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न आहे. तत्त्वज्ञानातील गोष्टी साधुनिक विज्ञानात सहज बसतात हेच अंती आपण पाहणार आहोत. पण जैनदर्शन व बौद्धदर्शने हीही भारतीय तत्त्वज्ञानाची महत्त्वाची अंगे आहेत. याशिवाय न्यायदर्शन, सांख्यदर्शन, योगदर्शन, पूर्वमीमांसादर्शन आणि वेदान्तदर्शन ही दर्शने भारतीय तत्त्वज्ञानाची प्रमुख अंगे आहेत. जिला वैदिक परंपरा म्हटले जाते ती म्हणजे यज्ञयाग करून दैवतांच्या कृपाप्रसादाने अभ्युदय मिळवू पाहणारी परंपरा. दुसरी शरीरक्लेशावर भर देणारी व स्वतःच्याच तपोबलावर निःश्रेयस साधू पाहणारी, ‘श्रमण परंपरा'. जैन आणि बौद्ध दर्शने ही या परंपरेतील होत. तत्त्वज्ञानांतर्गत ज्ञान म्हणजे निरनिराळ्या सिद्धान्तांची चर्चा. ती मांडल्या गेलेल्या सिद्धान्तांचे समर्थन करणारी वा विरुद्ध बाजू मांडणारी अशी असते. अशा



१५