पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

स्वाद, स्मृतीमध्ये साठवल्या जाणाऱ्या विचार, अनुभूती अशा गोष्टी आणि भावभावना, हालचाल करण्याची शक्ती वगैरे क्रिया देह या यंत्रावाटे होत असतात. त्या निरनिराळ्या अवयवांच्या कार्यामुळे घड्याळाप्रमाणे घडत असतात.'

 देकार्तचा काळ ध्यानात घेतला तर यात आपल्याला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण त्या काळच्या वैज्ञानिक ज्ञानातून हाच अर्थ निघत होता. परंतु आज विज्ञानाने एवढी प्रगती केल्यावरही, सामान्य मनुष्य देकार्तचे नावही माहीत नसतानाही ही संकल्पना घट्ट कवटाळून बसतो. पण ज्यांना आपण सामान्यांपेक्षा जास्त ज्ञानी समजतो ते जाणता, अजाणताही हेच तत्त्वज्ञान, हे सत्य नाही हे कळून सवरूनही, तेच अमलात आणत बसतात व जे लोक अध्यात्मावर विश्वास ठेवतात, व त्याप्रमाणे कार्य करतात त्यांची टिंगलटवाळी, त्यांना अज्ञानी म्हणणे व बहुधा अनुल्लेखाने मारून आपले तेच खरे करतात. भारतीय तत्त्वज्ञानाचा गूढार्थ, त्या काळात अनुभूतीने लिहिलेले ज्ञान याचेही आपण भारतीय कर्मकांड करत असतो. आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेले तेच अंतिम सत्य व याचा वेगळा विचार करणे म्हणजे श्रद्धाहीनता, अधार्मिकता असे मानणारे लोक आजही आहेत. अंगारा, तीर्थ, पूजा व जपजाप्य म्हणजे विज्ञानात न बसणाऱ्या गोष्टी व ती अंधश्रद्धा असा दृढ विश्वास बाळगणारे थोर विचारवंतही (?) आपण पाहतो. परंतु त्याचे दृढ असे नाते मनाशी - मुख्यतः अंतर्मनाशी निगडीत आहे, त्या क्रियांशी एकरूपता, तादात्म्य म्हणजे मनाचे उन्नयन, अंतर्मनाच्या शक्तीचे प्रगटीकरण आहे हे लोकांच्या ध्यानातच येत नाही.

 आज विज्ञानच सांगते की हा देहाचा यांत्रिक विचार बरोबर नाही. आणि जर हे यंत्रच मानावयाचे तर त्याचे भाग निरनिराळ्या दिशेने जात असतात व त्यांना काळ व स्थान यांचे काहीही बंधन नाही. हे असे एक यंत्र आहे की ज्याचे अनेक भाग सतत नाहीसे होत असतात, असे असूनही त्याला कोठल्या यंत्रदुरुस्तीच्या कारखान्यात न्यावे लागत नाही. तसेच हे काही यांत्रिक घड्याळ नाही, त्याचा प्रत्येक अणू प्रत्येक दशकात दोन वेळा स्वतःचे नूतनीकरण करून घेत असतो. या विषयात जसजसे तपशिलात जाऊ लागतो तसतसे त्याचे दरवेळी एक नवीन रूप दृष्टीस पडत असते. सर्व जीवमात्र पृथ्वीभोवतालच्या वातावरणातून प्राणवायूचे

१६२