पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

आहेस?" असे विचारत त्यांची नावेही (डोळे असून ) आंधळे या गटात गेली. शेवटी अकबर आला. त्यानेही हेच विचारले. त्याचेही नाव प्रथम स्थानी 'आंधळे' या गटात गेले. दुसऱ्या दिवशी ही यादी त्याने अकबराला दाखवली. आपले नाव आंधळ्यांच्या यादीत पाहून अकबराने आश्चर्याने विचारले की या यादीतील अनेक लोक डोळस आहेत. तू तर मला सुद्धा आंधळा ठरविलेस. बिरबलाने सांगितले "हुजूर, मी काय करतो आहे हे दिसत असूनही ज्यांनी मला तू काय करतो आहेस, हे विचारले ते आंधळेच नाहीत का?" तसे मुळात अनेक संवेदनाशक्ती मिळालेल्या असताना त्याही आपण घालवून बसत आहोत, मग आनुवंशिकतेने जेव्हा फरक होतात तेव्हा बोलावयासच नको. अपवाद सोडता दृष्टी, कर्णेद्रिये, स्पर्शज्ञान ह्या गोष्टी बव्हंशी समान असतात. थोडाफार फरक नसेलच असे नाही. मार्जारकुलातील सर्वांना बाहुल्या आकुंचन वा प्रसरण करून अंधारात सुद्धा स्पष्ट दिसते. त्यांच्या इतके नाही पण माणसाला अमावास्येच्या रात्रीसुद्धा लुकलुकत्या चांदण्यांच्या उजेडात लहानपणापासून सवय असेल तर बरेच दिसू शकते. आदिवासी अशा रात्रीही सहज फिरत असत. पण आता उजाडले तरी तरुणांना ट्यूबशिवाय दिसत नाही. पूर्वी रॉकेलचे कंदील किंवा चिमण्यांवर विद्यार्थी अभ्यास करावयाचे. टेंब्यांच्या उजेडात दशावतारी नाटके व्हावयाची. आज आधुनिक युगात विजेमुळे कितीतरी सुविधा निर्माण झाल्या आहेत व त्यांचे आपण स्वागत करावयासच हवे. पण त्यामुळे निसर्गदत्त शक्ती नष्ट होणे हे जरूर आहे का? हीच गोष्ट घ्राणेंद्रिये व कर्णेद्रियांचे बाबत घडत आहे. आनुवंशिकतेमुळे संवेदनाशक्ती व जाणिवा यांतील फरक हा अटळ असतो. व्यक्ती-व्यक्तीमधील हा फरक आपण जाणून घेतला पाहिजे.

 ब्रह्मांडामध्ये आहे तेच अंशरूपाने आपल्यामध्ये आले. ग्रह, तारे हेच आपल्या मूळ उत्पत्तीला कारण आहेत. कारण ही वसुंधरा त्याच ब्रह्मांडातून निर्माण झाली. तेव्हा त्या ग्रह, ताऱ्यांचे मूलभूत घटक हेच आपल्या अस्तित्वाचे कारण आहेत. हे अखिल विश्व म्हणजेच ब्रह्मांड. आपली पृथ्वी याचा एक छोटासा भाग. या विश्वाला सुद्धा काही नियम, काही बंधने आहेतच. त्यामुळे, उत्पत्ती, वस्तुमान, गती वगैरे गोष्टी निश्चित स्वरूपाच्या आहेत. या सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजेच 'कॉस्मॉलॉजी' (Cosmology) - विश्वाचे ज्ञान अथवा ज्योतिर्विद्या. " या विषयाचा अभ्यास व संशोधन असे दर्शविते की येथे घडणाऱ्या दैनंदिन घटना, असणारी वस्तुस्थिती ही१६६