पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

परत परत, नित्यनेमाने घडणारी घटना आहे. विश्वाचे दूर- अतिदूर असणाऱ्या भागांच्या अस्तित्वामुळेच हे घडत असते. हेच जर नसते तर आपल्या अवकाश, भूमिती यासंबंधी असणाऱ्या कल्पना, काही गृहितके हीच बाद झाली असती. आपला दैनंदिन अनुभव व छोट्या छोट्या गोष्टी या पूर्णपणे विश्वाशी निगडीत आहेत. या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत अशी शक्यताच नाही. किंबहुना अशी कल्पनासुद्धा अवास्तव ठरेल." अशा अर्थाचे निष्कर्ष आधुनिक वैज्ञानिकांनी काढले आहेत. हेच आपल्या तत्त्ववेत्त्यांनी पूर्वी लिहून ठेवले आहे. त्यात वैज्ञानिक निष्कर्षाची भर आधुनिक वैज्ञानिक घालत आहेत. आपले तत्त्वज्ञान व विज्ञान ह्या गोष्टी समांतर आहेत, त्यांत एकता आहे, असे 'प्रिगोजिन' (Prigogine) या वैज्ञानिकाने लिहून ठेवले आहे. हा वैज्ञानिक वस्तुमानशास्त्र (Physics) व रसायनशास्त्र यांत जाणकार होता व त्याअन्वये त्याने हे निष्कर्ष काढलेले आहेत. ह्या गोष्टीच आपल्या डोळ्यांवरील झापड दूर करत असतात.

 आपल्या ऋषि-मुनींचे ध्येय काय असे? त्यांना जी ओढ होती ती परमेश्वराशी एकरूप होण्याची, कैवल्यप्राप्तीची. यासाठीच ते तपश्चर्या करत असत व त्यातून त्यांनी या विश्वाची जी ओळख करून घेतली ती सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडील होती. त्यामुळे सामान्यांचा ह्यावर सहज विश्वास बसत नसे. आजही आपण यांना पुराणातील वांगी, व्यवहारात निरुपयोगी असेच मानत असतो. पण सत्य काय आहे याचे आपण कधीच चिंतन करत नाही. पाश्चात्य राष्ट्रांत असेच साधुसंत होऊन गेले व त्यांनीही तेच तत्त्वज्ञान सांगितले आहे. या गोष्टींना आजच्या वैज्ञानिकांनी शास्त्रीय आधार दिला आहे. इल्या प्रिगोजिन हा एक बेल्जिअम रसायनशास्त्रवेत्ता. १९७७ साली त्याला नोबेल पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक त्याला 'डिसीपेटिव्ह स्ट्रक्चर्स' (Dissipative Structures) या शोधनिबंधाबद्दल देण्यात आले. नोबेल कमिटीच्या सदस्यांचे उद्गार मोठे डोळे उघडणारे आहेत. ते म्हणतात-

 “प्रिगोजिनचे संशोधनकार्य म्हणजे आधुनिक विज्ञानातील बॉम्ब आहे. त्याने मांडलेली उपपत्ती, तत्त्वे यामुळे प्राणीशास्त्र व सामाजिक व वैज्ञानिक तत्त्वांना जोडणारा एक दुवा आहे. या दोन गोष्टीतील पूर्वीच्या संकल्पनात जे दूरत्व होते तेच कमी झाले आहे. त्याच्या संशोधनाचा पाया रसायनशास्त्र व गणित हा आहे. त्यावाटे

१६७