पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

त्याने काव्यात किंवा साधुसंतांनी मांडलेल्या गूढ तत्त्वांचा पाया म्हणजे निसर्गाशी आपण एकरूप आहोत, वेगळे नाही, हेच सांगितले आहे. उष्णता - गतिशास्त्रातील (Thermo-Dynamics) त्याचे तत्त्वज्ञान जणू काव्यरूपात मांडले आहे. "

 प्रिगोजिनचे संशोधन सूक्ष्मजीवांच्या जगताला पूर्णपणे लागू पडतेच परंतु ते दैनंदिन जीवनात सर्वत्र लागू पडते. या संशोधनाची व्याप्ती बरीच आहे. प्रिगोजिनपूर्वी बॅरन या संशोधकानेही ह्याच संबंधात आपले निष्कर्ष लिहून ठेवले आहेत. आपला समाज स्वतःला सुधारणावादी म्हणवतो. विज्ञानाला आजच्या युगाचे वरदान म्हणतो. परंतु अल्बर्ट आइनस्टाईन, फ्रेड हॉईल, सर एकल्स, डॉ. रवी रवींद्र, डॉ. कोठारी यांच्यासारखे अनेक अतिशय श्रेष्ठ वैज्ञानिक व संशोधक यांनी तत्त्वज्ञानाला फार उच्च स्थान दिले आहे. ते अध्यात्म हेही विज्ञानच आहे असे म्हणतात. प्रिगोजिनची डिसिपेटिव्ह थिअरी व तत्त्वज्ञानातील 'कोऽहं'चा शोध हे समांतरच आहेत. या थिअरीप्रमाणे मानव म्हणजे अनेक भागांचे बनलेले एक चालते बोलते, विचार करणारे, स्वतःचे स्वतःच शरीराची झालेली नादुरुस्ती दुरुस्त करणारा यांत्रिक, रोगमुक्तीसाठी डॉक्टर, स्वतःच औषध निर्माण करणारी फार्मसी, असे एक यंत्र आहे. या संशोधनातून निघालेला महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे मानवाला येणारे अनुभव व या विश्वातील सूक्ष्म गोष्टींचे अस्तित्व, त्यांच्या हालचाली ही बाब समांतरच आहे. प्रिगोजिन म्हणतो ह्या समांतर गोष्टी विश्वातच निर्माण झालेल्या आहेत. कोठलेही डिसिपेटिव्ह स्ट्रक्चरचे (विविध भागांचे बनलेले वस्तुमान व प्राणीजीव) सर्व भाग हे अत्यंत सहकाराने जगत असतात. एवढेच नव्हे त्यांचा एकमेकांशी संवाद चालू असतो व प्रत्येक अणू त्याच्या मूळ भागासाठी स्वतंत्रपणे व एकत्रित कार्य करत असतो. हातातील प्रत्येक पेशी एकत्रितपणे हातासाठी व अंती एकूण देहासाठी कार्य करत असते. निरनिराळ्या ग्रंथी, विशिष्ट भागासाठी व

देहासाठी त्यांचे कार्य म्हणजे स्रावनिर्मिती करत आहे. मग सत्याशी फारकत घेणे, त्याला विसरणे हे करंटेपण आहे. भारतीय, पाश्चात्य, इजिप्शिअन अशा सर्व तत्त्वज्ञानांत ह्या वैज्ञानिक सत्याचे अस्तित्व सापडते. त्याला जाति-जमाती, , देश- परदेश अशा कशाचीच बंधने नाहीत. ह्याचा संबंध आरोग्याशी काय हा प्रश्न आपल्यापुढे येतो. त्याचे उत्तरही तसे अवघड नाही.

१६८