पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

डिसिपेटिव्ह थिअरी व आरोग्य :

 ही थिअरी पूर्णतः शरीरशास्त्राला लागू आहे, किंबहुना त्या शास्त्राचा तो एक अतूट भाग आहे. यामुळे त्याद्वारा आपण आरोग्य आणि विकार यांचा विचार करू शकतो. अत्यंत निसर्गदत्त जीवनशैली जर अवलंबिली तर संपर्ण जीवन निरामय, एकदाही विकार न होता जगता यावयास पाहिजे. हे एक आदर्श जीवन होईल. परंतु असे कधीही घडत नाही. प्रिगोजिनच्या थिअरीप्रमाणे जर विकाराची छोटी छोटी रूपे निर्माण झाली तर ती कधीही मोठी गुंतागुंत निर्माण करत नाहीत. सर्दीसारखे विकार आपोआप बरे होतात. पण ते मोठ्या आजारात होत नाही. समजा, एखाद्या दारू पिणाऱ्याने दारू पिऊन त्यावर अॅस्पिरिन घेतले तर पोटात अल्सर, अस्तराला सूज व त्यापासून गंभीर आजार निर्माण होतील. अपचन, कळा व कदाचित रक्तस्रावही होईल. ते ज्ञान मिळाल्यापासून आपण दारू व ॲस्पिरिन एकत्र घेणे शक्य नाही. ही गुंतागुंत बाह्य वातावरणातून अंतर्गत भागात गेली, तिने मोठा आकार घेतला. यातूनच आपल्यात मानसिक बदल होत असतो. मोठी गुंतागुंत मोठी अंतर्दृष्टी व उच्च दर्जाची जाणीव निर्माण करते. तसेच ह्या गुंतागुंतीला सुयोग्य प्रतिकारशक्तीही येऊ शकते. पण हे नेहमी घडतेच असे नाही. अशा गुंतागुंती फक्त शरीरसंस्था ढवळून काढत नाहीत, तर त्यांचा नाशही होऊ शकतो व शेवटी मृत्यूही ओढवू शकतो. दारू व अॅस्पिरिन यांनी जे होऊ शकते तेच तीव्र औषधांनीही होऊ शकते. औषध म्हणजे बाह्य वातावरणातील पदार्थ शरीरांतर्गत विश्वात जातो. प्रमाण सूक्ष्म असेल तर ते प्रतिकारशक्तीला मदत करून गुंतागुंत नाहीशी करण्यास मदत करते. परंतु तीव्र शक्तीची उच्च मात्रेमध्ये बऱ्याच काळ दिलेली औषधे एकूण अंतर्भागात खूप खळबळ निर्माण करतात, शरीराच्या एकेका भागाचा मोठ्या प्रमाणात नाश करतात व नवीन गुंतागुंती निर्माण करतात. यात प्रतिकारक्षमता वाढण्याऐवजी नष्टच होत असते.

 या थिअरीप्रमाणे दौर्बल्यातूनच सबलत्व येत असते. असे दौर्बल्यच मुळात झालेले नसेल, शरीराला त्याचा अनुभव नसेल, तर संबंधित अवयव व अंती देहच नष्ट होतो, मृत्यू घडतो. १८०० साली हवाई बेटावर अनेक अमेरिकन्स जाऊ लागले, तेथे राहू लागले. आपल्या सोबत अनेक विकार, जे मूळ आदिवासींना माहीतच नव्हते, ते घेऊन गेले. त्यांतील एक म्हणजे गोवर. हा विकार म्हणजे देहात तात्पुरती

१६९