पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्रत्येक पेशीला बुद्धी आहे, एकमेकांशी संवाद करण्याची शक्ती आहे व जेव्हा बाह्य विश्वातून शत्रूचा हल्ला होतो तेव्हा त्याची सूचना सर्वत्र दिली जाऊन त्याविरुद्ध युद्धाची ताबडतोब तयारी होते. हीच देहात त्या काळात निर्माण होणारी खळबळ. अशा खळबळीच्या निर्मितीशिवाय खऱ्या अर्थानि कधीही आरोग्य प्राप्त होणार नाही. ज्यांच्या शरीरात अशी खळबळ निर्माणच होत नाही ते अल्पकाळातच मृत्युमुखी पडतात. आपले शरीर म्हणजे या युद्धशास्त्राच्या ज्ञानाचा ठेवा. हे ज्ञान बालपणापासून थोडे थोडे वाढत असते. बालकांना सहा-सात वर्षांनंतर उत्तम प्रतिकारशक्ती येते. याचा अर्थच असा - जशी सैनिकांची प्रत्यक्ष युद्धासाठी तयारी केली जाते, हल्ला व प्रतिहल्ला यांचे अनुभव दिले जातात तेव्हाच ते ज्ञान त्यांच्या देहात एकरूप होते व कोठलाही विचार न करता प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी प्रतिकार व प्रतिहल्ला करू शकतात. बाह्य विश्वातून जेव्हा आरोग्यावर हल्ला होतो तेव्हा त्याचा प्रतिकार करण्याची शक्तीही कामी येत असते. ही शक्ती पूर्णतः नैसर्गिक किंवा जन्मजात नसते. नैसर्गिक किंवा लसीकरणाच्या खोट्या खोट्या युद्धातून ही निर्माण होत असते. हीच थिअरी प्रिगोजिनने स्पष्टपणे मांडली.

 आरोग्याच्या संकल्पनेच्या मुळाशी जावयाचे असेल तर त्यासाठी खोल जावे लागते. शरीरात ही जी खळबळ किंवा छोटी मोठी वादळे निर्माण होतात त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची पूर्ण क्षमता असणे हे आहे. आपली आरोग्याची कल्पना आजाराशी निगडीत आहे. आजार झाला की अनारोग्य समजले जाते त्याऐवजी 'आजाराशिवाय आरोग्य नाही' अशी दर्शनी वदतोव्याघात वाटणारी व्याख्या करणे उचित होईल. यामुळे आरोग्यप्राप्ती व शरीरात निर्माण होणारी वादळे ही एकमेकांना पूरकच आहेत. प्रत्यक्षात असे वादळ निर्माण झाले की त्यातून मुक्तीसाठी गोळ्या, इंजेक्शन्स, शल्यकर्म याचाच वापर ताबडतोब सुरू होतो. मुळात आपण प्रतिकारासाठी प्रयत्नच करत नाही. आपल्याला हवा असतो क्षणार्धात दिलासा, आजारापासून मुक्ती. आज अशी परिस्थिती आहे की रोज नवीन, जास्त शक्तिमान औषधांची गरज भासू लागली आहे. पण यामुळे आपण आपली स्थिती प्रतिकारशक्तीच नसलेल्या जन्मजात बालकासारखी निर्माण करत असतो. शेवटी शेवटी तर प्रतिकारशक्तीच नसल्यामुळे कितीही शक्तिमान औषधे दिली तरी मृत्यू अटळ असतो. या बाह्य शत्रूपासून संरक्षणासाठी आपली रणनीती काय असावी?

171