पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

-

अवयवांची बुद्धी कमी पडते. यामुळे बाह्य मदतीची औषधांची जरुरी निर्माण होते. पण या अशा घटना नेहमीच अपवादात्मक असतात, नित्य नैमित्तिक नसतात. सर्वसाधारण नियमान्वये शरीराची शत्रूंशी लढण्याची क्षमता अफाट असते व औषधे किंवा शल्यकर्म ही युद्धाची दुसरी फळी वापरण्याची वेळ अपवादात्मक असते. यामुळे अनेक वेळा आपल्याला काहीही न समजताच ही पहिली फळी शत्रूचा निःपात करते. अत्यंत प्राचीन अशा आदिवासी जीवनापासून जीवाणू, विषाणू या शत्रूंच्या लढाईतून आपली यंत्रणा अधिकाधिक कार्यक्षम होत गेलेली आहे. यामुळेच अनेक वेळा आपल्या नकळत ही लढाई आपण जिंकत असतो. साधेच उदाहरण घ्या ना. हल्ली आपण कमीत कमी दोन वेळा म्हणजे सकाळी व रात्री ब्रशने जोराजोराने दात घासतो. त्यासाठी उत्तम पेस्ट वापरतो. प्रत्येक पेस्ट तयार करणारी कंपनी आमचीच टूथपेस्ट उत्तम असते असे म्हणते. पण ते पूर्णपणे असत्य आहे. ब्रशचे मुख्य कार्य दातांच्या फटीतील अन्नकण काढून टाकणे हेच आहे. हे अन्नकणच जीवाणूंच्या निर्मितीचे स्थान असते. ते काढले नाहीत तर सतत जीवाणुनिर्मिती होऊन दंतरोग बळावत जाणारच. तेच पूर्णपणे काढून टाकले तर आधीचे जीवाणू चार मिनिटांपेक्षा जास्त जगूच शकत नाहीत. शरीरच ते मारून टाकते. कोणतीही पेस्ट जंतुनाशक म्हणून कार्य करत नाही. मुखाची स्वच्छता हेच मोठे जंतुनाशक आहे. प्राचीन काळापासून अनुभवातून शरीराने मिळविलेले ज्ञान अतिशय उपकारी आहे. सर्वसाधारणपणे औषधासारखी बाह्य मदत आपल्याला लागतच नाही.

 वैद्यक व्यावसायिक व मानसविकारतज्ज्ञ हे दोघेही आधुनिक तज्ज्ञ. पण त्यांच्यामध्येही एखाद्या रुग्णाविषयी मतभेद होतात. साधे जठरव्रणाचे (Peptic Ulcer) चे उदाहरण पाहा. आधुनिक डॉक्टर 'हायपर अॅसिडिटी' हे मूलभूत कारण धरून आधी 'रॅनिटिडिन - फॅमोटिडिन' सारखी औषधे देणार, नाहीतर शल्यकर्म आहेच. पण या दोन्ही गोष्टी म्हणजे अत्यंत वरवरच्या. यानंतर परत व्रण होणार नाही याची खात्री काय? याचा अर्थ आधुनिक वैद्यक फक्त वरवरच्या लक्षणांचाच विचार करते. अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी असे लिहून ठेवलेले आहे की या रुग्णांपैकी बहुतांश लोक दीर्घकाळ ताणतणावांचे बळी असतात. हे नाहीसे करण्यासाठी औषधेच नाहीत. येऊन जाऊन 'रेस्टिल ०.२५' सारखी औषधे देऊन तात्पुरती

१७३