पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राहते. वैद्यकाच्या अशा मर्यादा अनेक वेळा नजरेस पडतात. परंतु अशी केस जपजाप्य, प्रार्थना किंवा तत्सम आध्यात्मिक मार्गांनी जर बरी झाली तर तिला पौराणिक कथांप्रमाणे सत्यात नसलेल्या किंवा करमणूक करणाऱ्या कथांच्या यादीत ढकलले जाते. परंतु अशा कथा म्हणजे संबंधित व्यक्तीच्या देहमनाची तादात्म्यता. हे शरीराचे स्वतःचे स्वतःच रोगमुक्त होण्याचे प्रत्येकापाशी असलेले ज्ञान. हे ज्ञान एखाद्या राखेखाली झाकलेल्या निखाऱ्यासारखे असते. ती अज्ञानाची राख झाडून टाकली तर ज्ञानाचा धगधगीत अग्नी वर येतो व तो विकार जाळून टाकतो. याची अत्यंत आधुनिक काळातील कहाणी पाहू या.

 नॅन्सी ही तरुण, अतिशय बुद्धिवान व सुंदर अशी एकोणतीस वर्षांची एक तरुणी. तिला नेहमी छातीत दुखावयाचे व हे जवळजवळ पाच वर्षे चालू होते. मग मात्र तिला हलणेही मुष्किल झाले. तिच्या बरगड्यांच्या सांध्याच्या हाडाभोवतालची जागा (Sternumn), त्याचे अस्थिबंध, स्नायुबंध अशा ठिकाणी खूप सूज, लाली व वेदना होत. हा जो भाग असतो त्याला स्टर्नोकॉस्टोकॉन्ड्रल एरिया (Sternocostochondral Area) असे म्हणतात. या बरगड्या जोडहाडाला (Sternum) कूर्चेच्या तुकड्या तुकड्यांनी जोडलेल्या असतात. ह्या विकाराला कॉस्टोकोन्ड्रायटिस (Costochondritis) असे म्हटले जाते व तो विकार बहुधा विषाणुसंसर्गामुळे झालेला असतो. नॅन्सीला हा विकार झाला होता. सर्वसाधारणपणे हा विकार दीर्घकाळ चालणारा नाही. ॲनल्जेसिक गोळ्या, शेक व विश्रांती यांनी तो बरा होतो. पण नॅन्सीची केस हाच विकार असून ह्या नियमात बसत नव्हती. हा विकार अचानकपणे उद्भवावयाचा. वर्षातून बरेच वेळा हे घडून यावयाचे व तिला पडून राहावे लागणे व असह्य वेदनांना तोंड देणे हेच व्हावयाचे. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिला या काळात काहीच कार्य करता यावयाचे नाही. कारण हातांची कसलीही हालचाल त्या कळा वाढवण्यास कारणीभूत होत असे. हॉस्पिटलमध्ये ज्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात शरीरात काहीही उणिवा वा वेगळेपणा निर्माण झालेला आढळला नाही. हे पाहून तिला संधिवाततज्ज्ञाकडे नेण्यात आले, पण तेथेही तोच प्रकार. एकूणच सर्व मानवी आकलनापलीकडील गोष्टी आढळल्या. ह्या सर्वातून नॅन्सीला निराशा आली व तिने श्वसनसंस्थातज्ज्ञाकडे जाण्याचे ठरवले.

१७५