पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा या कंपन्यांपैकी कोणाचा दावा सत्य आहे, हे पाहण्याचा हाच एक राजमार्ग. परंतु त्यातही किती अडचणी येऊ शकतात याची आपणा सामान्य माणसांना कल्पना नसते. समजा, आपण एकाच व्यवसायातील वीस लोकांचे समान काळ वापरलेले शर्ट घेतले. त्यापैकी दहा 'अ' कंपनीच्या साबणाने धुतले व दहा 'ब' कंपनीच्या साबणाने धुतले. ‘अ’ कंपनीचे कपडे जर जास्त स्वच्छ निघाले तर 'ब' कंपनी म्हणणार की आमच्या गटाला जास्त मळके कपडे आले होते, त्यामुळे हा फरक दिसला. काही माणसे मोटारीने प्रवास करतात, काही स्कूटरने तर काही बसने, बसने प्रवास करणाऱ्यांचे कपडे जास्त गलिच्छ होतात. तेव्हा मोटारवाले व बसवाले यांची तुलनेसाठी समान पातळी असूच शकत नाही. तेव्हा ही चाचणी चुकीची आहे. मग आपण बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेच शर्ट घेतले व निम्मे निम्मे वाटून ते धुतले. यात जी कंपनी कनिष्ठ ठरली, ती लगेच म्हणणार की आम्हाला जे शर्ट मिळाले ते वापरणारे लोक जात्याच अस्वच्छ, कपड्यांचा गुधडा घालणारे होते. असे होता होता शेवटी एकाच व्यक्तीचा एकच शर्ट बरोबर मधोमध कापला, एक तुकडा एका कंपनीला, दुसरा दुसऱ्या कंपनीला दिला तर जी कंपनी हरली ती म्हणेल आम्हाला उजवी बाजू वाटणीला आली. त्या बाजूला घाम जास्त येतो म्हणून हे घडले. थोडक्यात, छिद्रान्वेषी लोक सतत काहीतरी उणिवा शोधत बसणार. शेवटी सत्य शोधणे हे किती कठीण होईल याची कल्पना येत नाही. अंतिम सत्य असे काहीही नसतेच.
 वैद्यकशास्त्रातही अशा चाचण्या घेतल्या जातात. एका समान विकाराच्या लोकांचे दोन गट करून एका गटाला औषध व एका गटाला प्लॅसिबो देऊन गुण पाहिला जातो. यात त्या रुग्णांना किंवा औषधे देणाऱ्या डॉक्टरांनाही याची माहिती दिली जात नाही. या पद्धतीला डबल ब्लाइंड (Double Blind) पद्धत म्हणतात. जर डॉक्टर किंवा पेशंट यापैकी एकाला हे माहीत आहे व दुसऱ्याला नाही तर

त्याला सिंगल ब्लाइंड म्हणावयाचे. यातून जे निष्कर्ष निघतात ते वैज्ञानिक दृष्ट्या मान्य समजले जातात. पण छिद्रान्वेषी यातूनही अनेक संशय काढू शकतात. दोन्ही गटांतील जे रुग्ण होते त्यांना विकार जरी एकच असला तरी त्या प्रत्येकाची स्वसंरक्षणक्षमता काय होती, त्यांच्या रोगाची पातळी काय होती, त्यातील स्त्रिया किती व पुरुष किती, दोन्ही गटांतील रुग्णांची मनाची अवस्था काय होती, किती

१७७