पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपणास होत नाही त्या सर्वच खोट्या असे म्हणणे युक्त होणार नाही. अगदी वैद्यकशास्त्रांत सुद्धा अत्यंत आधुनिक यांत्रिक अवजारे अतिशय उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर्स, सर्व पॅथो चाचण्या यांतून काहीही निष्कर्ष निघत नाहीत तेव्हा एन्. ए.डी. (No abnormality detected) हा शेरा मारला जातो. तसेच ज्या निरनिराळ्या कहाण्या आपण पाहणार आहोत त्यांची उत्तरे सापडत नाहीत. तेव्हा त्यांना पुराणातील वांगी न म्हणता तूर्त तरी मानवी बुद्धीच्या हे पलीकडील आहे, असे म्हणून ती गोष्ट सत्य समजली जावी. याला पाहिजे तर अशा मार्गातून निर्माण होणारी थेरपी असे म्हणूया. त्या पद्धतीचा पाया आहे तो देहमनाच्या एकरूपतेचा. यातूनच रोगाची लक्षणे नाहीशी होतात. ही थेरपी एकमेव सर्व विकारही दूर करेल असे नाही. ती संपूर्णपणे वैद्यकाची जागा घेईल असेही नाही. परंतु जेव्हा वैद्यकशास्त्राने विकार दूर होत नाहीत तेव्हा व वैद्यकाला पूरक म्हणून हे सहज आकलन न होणारे शास्त्र आहे. डिसिपेटिव्ह उपपत्तीचा हाच पाया आहे. ती आपणास निसर्गाशी एकरूप होण्यास सांगते. तसेच आपणास देहाचा नुसता वरवर विचार न करता त्यातील सूक्ष्म विश्वाचा खोलवर विचार करण्याचा सल्ला देते. शेवटी वैश्विक तत्त्वज्ञान हे सूक्ष्म विश्वाचे ज्ञान देणारे तत्त्वज्ञान आहे. आपण प्रथम भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून त्यात जी नवनवी भर पडत आहे ती जाणून घेतली पाहिजे. ज्याला आपण प्रतिबंधक वैद्यक (Preventive Medicine) म्हणतो, त्याला सुद्धा मर्यादा आहे. हे विषय तसे आकलनास सोपे आहेत. परंतु मनाचा ठाव घेणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्यामुळेच एका परिस्थितीत मिळणारे उत्तम परिणाम सतत मिळतीलच असे नाही. पण हे प्रमाण वाढवणे शक्य आहे. वैद्यकशास्त्रात प्रगतीसाठी सतत प्रयोग करत राहणे ही साधना करावी लागते. तीच साधना अध्यात्माच्या ज्ञानासाठी करावी लागते, हे सत्य आहे.

१७९