पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैद्यक आणि साक्षात्कारी अनुभव

आयुर्वेद हा उपवेद तसा हजारो वर्षांपासून भारतात चालत आलेला आहे. याचा अर्थ की आयुर्वेद हा खऱ्या अर्थाने भारतीय तत्त्वज्ञानाचा भाग आहे व त्याचा उपयोग करताना सुद्धा त्याला पूरक तत्त्वज्ञानाचा विसर पडून चालणार नाही. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्राने त्याला मागे टाकले आहे. यात डॉक्टर्स व रुग्ण हे तितकेच सहभागी आहेत. आधुनिक वैद्यकाचा भौतिक पाया तसा विज्ञानाधिष्ठित आहे. परंतु एकूण मनाचा विचार तुलनात्मक दृष्ट्या फारच कमी वाटतो. आज मानससास्त्रही खूपच प्रगत झाले आहे. पण या सर्वांच्या पलीकडे काही आहे का? असा विचारवंतांना नेहमीच प्रश्न पडला आहे. आयुर्वेद हा श्रेष्ठ का आधुनिक वैद्यकशास्त्र श्रेष्ठ असा निरर्थक वाद आपले वैद्यक व्यावसायिक नेहमीच करत आले आहेत. हा असतो निव्वळ अहं. आज आयुर्वेदातील तज्ज्ञांच्या सुद्धा अनेक केसेस त्यांना हाताळता न आल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच आधुनिक वैद्यक तज्ज्ञही अनेक वेळा साध्या विकारांचे रूपांतर गंभीर आजारात झालेले पाहून कुंठित होतात. चालू आधुनिक युगात एका विकारातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी अशा अनेक गंभीर समस्या निर्माण होत असलेल्या आपण पाहतो. यामुळे आयुर्वेदातील ज्या संहिता आज उपलब्ध आहेत त्यांच्याही पलीकडे काहीतरी होते व ते आज आपण गमावलेले आहे असा संशय येऊ लागतो. तीच गोष्ट आधुनिक वैद्यकाची. नवनवीन यांत्रिक उपकरणांनी रोगचिकित्सा सोपी झाली आहे असे दर्शनी दिसते.

१८०