पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवनवीन औषधेही बाजारात येत असतात. परंतु एकूण समाजाचे आरोग्य सुधारले आहे असे मुळीच वाटत नाही. कारण काही विकार काबूत येत आहेत असे दिसते, त्यापेक्षा कधीही बरे होत नाही असे विकारही दिसतात, व ते सतत वाढतच चालले आहेत. मग विकास कशाला म्हणावयाचे?
 या सर्व गोष्टींचा तात्त्विक अर्थ असा दिसतो की आपली भारतीय परंपरा ही निव्वळ जडदेहाचा विचार न करता एकूण जीवनाचे हार्द काय आहे हे जाणून घेण्याची कला आहे. आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे या विश्वाच्या मुळाशी जे अजर, अमर तत्त्व आहे ते जाणून घेण्याची सर्व ऋषि-मुनींना ओढ होती. त्या तत्त्वालाच त्यांनी आत्मा, ब्रह्म असे म्हटले आहे. प्रत्येक चल व अचल वस्तूत हेच असते. आत्मा हा अणूपेक्षाही लहान व अखंड विश्वापेक्षाही मोठा आहे. मानवप्राणी म्हणजे अखिल विश्वातील एक सूक्ष्म जीव. तो पंचमहाभूतांनी घडलेला आहे. त्याला देह आहे, इंद्रिये आहेत व मनही आहे. "मन हे रथाच्या घोड्यांचा लगाम व इंद्रिये हे घोडे आहेत” हे तत्त्व आपण मागे पाहिलेच आहे. तेव्हा ब्रह्म वा आत्मा हे अंतिम सत्य असेल, तर आपल्याला नुसत्या देहाचा तुटक विचार करून चालणार नाही, तसाच नुसत्या मनाचा विचारही एकांगीच ठरेल. याही पलीकडे काहीतरी आहे. ज्ञान म्हणजे अथांग महासागर, यासाठी जन्म-मृत्यूचे कोडे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे हे ऋषि-मुनींचे ध्येय होते. मानवाला बुद्धीचे वरदान मिळालेले आहे. त्याचा उपयोग वैद्यकशास्त्राने 'माणूस' पूर्ण जाणून घेणे, काळ व अवकाश यापलीकडे विचार करणे जरूर आहे. वैद्यकशास्त्रांच्या ज्ञानाला तत्त्वज्ञानातील 'तत् त्वम् असि ।' याची जोड दिली गेली पाहिजे. म्हणूनच आपण काही घटना, त्यांचा अन्वयार्थ व अंतरीचे तत्त्व म्हणजेच हार्द जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

 पुढे दिलेल्या काही घटना म्हणजे त्या व्यक्तींची मानसिकता काय होती, त्यामुळे होणारे परिणाम, त्या मानसिकतेची मूलभूत कारणे वगैरे गोष्टी साकल्याने जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. यांतील काही भारतात तर बऱ्याचशा अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांत घडलेल्या आहेत. आजच्या वैद्यकशास्त्राच्या मर्यादा यावरून स्पष्टपणे कळतात. आजचे वैद्यकशास्त्र हे नुसते लक्षणानुसार औषधोपचार करणारे शास्त्र न राहता, त्याने 'नुसती रोगमुक्ती मिळवणे हेच ध्येय न ठेवता लक्षणापेक्षा कारणांचा विचार करून रोगमुक्तीच नव्हे तर मानवाचे संपूर्ण आरोग्य

१८१