पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याला मिळवून देणे हे ध्येय समजले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येप्रमाणे "आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक स्तरावरील समस्थिती" हेच वैद्यकशास्त्राचे ध्येय असले पाहिजे. मुळात वैद्यक ही विशिष्ट लोकांची मालकी नव्हती. घरोघरी उपचार चालत असत. हे उपाय बंद होण्याचा इतिहास तसा काळा आहे. पण तो झाला भूतकाळ. आज वैद्यकशास्त्राने निश्चितपणे खूप प्रगती केली आहे. अनेक प्रकारे निदान जास्त परिपूर्ण होत चालले आहे. परंतु ही स्थिती पूर्ण सत्य किंवा अंतिम नाही. ती फक्त एकांगी जीवनाच्या एका भागाची व तोकडी आहे. मग याच्या पलीकडे काय आहे? वैद्यकशास्त्राला परिपूर्णता कशी येईल? याचा ऊहापोह आपण करणार आहोत. ओघानेच त्यासाठी आधिभौतिक, आध्यात्मिक व आधिदैविक स्तरांवर म्हणजे आपल्या तत्त्वज्ञानातील सर्वांगाने ही चर्चा केली आहे व करूया. येथे विस्तारभयास्तव प्रत्येक प्रकाराची थोडी थोडीच उदाहरणे आपण पाहणार आहोत.
काही घटना व काही अन्वयार्थ :
केस नं. १ :
ही घटना सुमारे १९२० च्या आसपासची आहे. ही जिम कॉर्बेट, ज्याच्या नावाने 'कॉर्बेट अभयारण्या'ची निर्मिती झाली आहे, त्याने आपल्या पुस्तकात दिलेली आहे. जिम कॉर्बेट व त्याचा मित्र रॉबर्ट बिलेअर्स यांनी 'त्रिशूळ' या देवतेच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या पर्वताच्या पायथ्याशी मुक्काम केला होता. त्या काळात प्रवासाची साधने फारच अपुरी व त्यामुळे अत्यंत घनदाट जंगलामध्ये बहुधा पायीच प्रवास करावा लागे. फार फार तर तट्टू, जिम कॉर्बेटने आयुष्याची बत्तीस वर्षे नरभक्षक वाघांची शिकार करण्यात घालवली. प्रत्येक वेळी पायी, दूरवर चालत जाऊन मुक्काम करावयाचा म्हणजे त्यासाठी बरेच सामान बरोबर न्यावे लागे. यामुळे त्याचेबरोबर आचाऱ्यासकट सात-आठ माणसेसुद्धा असत.

 बिलेअर्स बरोबर शिकारीस जाताना त्याचे बरोबर सामान वाहून नेण्यासाठी सहा गढवाली नोकर होते. त्यांपैकी एक बालासिंग नावाचा गढवाली जिम कॉर्बेटकडे अनेक वर्षे कामास होता, अतिशय विश्वासू, आनंदी व आपण होऊन जास्तीत जास्त काम करणारा म्हणूनच तो जिम कॉर्बेटचा लाडका असावा. त्रिशूळच्या

१८२