पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पायथ्यापाशी जी सुयोग्य जागा कॉर्बेट व बिलेअर्स यांनी पसंत करून मुक्काम केला, त्याचे दुसरेच दिवशी या नोकरांनी सर्व सामानाचे पॅकिंग करून पुढे निघण्याची तयारी केली. हे सहा नोकर असूनही त्यांनी ओझी मात्र पाचच केली होती. कारण विचारता “ही जागा चांगली नाही, पाणी घाण आहे, सरपण चटकन मिळत नाही. येथून दोनच मैलांवर पुढे उत्तम जागा आहे." असे न पटणारे उत्तर मिळाले. बालासिंग दूर एकटाच ब्लँकेट पांघरून स्वस्थ बसला होता. कॉर्बेट त्याच्याकडे जाऊ लागताच सर्व जण त्याच्याकडे टक लावून पाहू लागले. बालासिंग जागेवरून उठला सुद्धा नाही. प्रत्येक प्रश्नाला त्याचे उत्तर एकच. "मी आजारी नाही.' परंतु बालासिंगची जी स्थिती झाली होती त्यामुळे सर्व कँपवरच भीती व तणावाची छाया होती.
 कॉर्बेटचा दुसरा विश्वासू नोकर मोतीसिंग. तोही सुरुवातीस काही सांगेना. पण शेवटी कॉर्बेटच्या सततच्या चौकशीस नाइलाज म्हणून त्याने खालील माहिती सांगितली. तो म्हणाला, "काल रात्री आमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गाणी गाण्यास सुरुवात केली. एक जण ओळ म्हणावयाचा व नंतर सर्व जण एकसुरात ती ओळ म्हणावयाचे. गाणे गाता गाता त्रिशूळचा वेताळ छोटे रूप घेऊन बालासिंगच्या तोंडावाटे त्याच्या पोटात शिरला आहे. आम्ही खूप आरडाओरडा केला, डबे वाजवले, पण काही उपयोग झाला नाही." नंतर बालासिंगला विश्वासात “घेऊन काय झालं?” असे विचारताच तो म्हणतो, “साहेब, तुम्हा लोकांचा यावर विश्वास बसणार नाही." कॉर्बेट म्हणाला, “बाला, इतक्या वर्षात एकदा तरी अस झालं आहे का, की मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही?" साहेबावरील प्रेम व विश्वास यामुळे बालासिंगने घडलेली हकीकत त्याला सांगितली. कॉर्बेटने सोबत देऊन त्याला घरी पाठवून दिला.

कॉर्बेट घरी येताच नैनीतालचा सिव्हिल सर्जन कर्नल कुकला बालासिंगला काय झाले आहे, हे पाहण्यास बोलावले. कर्नल कुक व कॉर्बेट यांची दोस्ती होती. डॉ. कुकने बालासिंगला काहीही झालेले नाही आणि त्याची प्रकृती उत्तम आहे, असे सांगितले. काही दिवसांनी बालासिंगमध्ये बदल न झाल्याने नैनिताल येथे एक नावाजलेला भारतीय डॉक्टर होता. त्याच्याकडे कॉर्बेट बालासिंगला घेऊन गेला.

१८३