पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या डॉक्टराने बालासिंगला पाहताच 'हे काही वेगळेच आहे' हे ओळखले. डॉक्टर स्वतः गढवालीच होता. बालासिंगला त्याने काही प्रश्न विचारले व सत्य त्याला कळले. तो कॉर्बेटला म्हणाला, "माफ करा साहेब, मी याच्यासाठी काहीही करू शकत नाही." शेवटी कॉर्बेटने बालासिंगला त्याच्या गावी पाठवून दिले. बालासिंगने काही त्रास न देता निर्विकार चेहन्याने तो प्रवास केला व घरी गेल्यापासून फक्त निपचित पडून राहिला. शेवटी एक दिवस "वेताळ माझ्या पोटातून बाहेर येतो आहे" असे म्हणून डोळे मिटले ते कायमचे. ही हकीकत नंतर तेथील लोकांनी कॉर्बेटला सांगितली. आता यातून उद्भवणारे प्रश्न असे-
 (१) अवघा तीस वर्षांचा तगडा बालासिंग काहीही शारीरिक आजार नसताना का मेला? डॉ. कुकने याला काहीही झालेले नाही असे सांगितले होते.
 (२) वेताळ त्याच्या पोटात गेला ही फक्त त्याचीच कल्पना नसून इतरांनी ही गोष्ट समक्ष पाहिली. सर्वांचाच त्यावर दृढ विश्वास बसला होता.
 (३) भुते, वेताळ या फक्त कल्पना आहेत हे आपण जाणतो. मग बालासिंगला त्या कल्पनेनेच आत्यंतिक भीती वाटली का ?
 (४) यातूनच त्याला मोठ्या प्रमाणावर औदासीन्य (Depression) आले असावे. पण नुसत्या औदासीन्याने मनुष्य मरू शकत नाही.
 याचे हार्द जे दिसते ते एवढेच की त्या वेळी देव, धर्म, भुते-खेते, वेताळ, हडळी यावर बहुसंख्य लोकांची श्रद्धा होती. या धारणाच याला कारणीभूत असतात. देव चांगले करतो व वेताळ वाईटच करणार, ही ज्यांची जशी श्रद्धा असे त्याप्रमाणे मन ते घडवून आणत असे.
केस नं. २ :

 आपल्याकडे जसे तांत्रिक, मांत्रिक यांचे एकेकाळी जबरदस्त प्रस्थ होते तसेच प्रस्थ आफ्रिकेतही मोठ्या प्रमाणावर होते. तेथील प्रत्येक जमातीत असा एक मांत्रिक असे. हा मांत्रिक म्हणजे त्या जमातीचा गुरू, न्यायाधीश, डॉक्टर असे सर्वकाही एकात सामावलेली व्यक्ती असे. हा तांत्रिकही असल्यामुळे तो मंत्राने रोग बरे करी; तसे मंत्राने तो लोकांचे वाटोळेही करू शकतो अशी त्या लोकांची श्रद्धा

१८४