पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होती. 'मेरोला' ह्या पाश्चिमात्य प्रवाशाने आपल्या डायरीत कांगोतील एक कहाणी नमूद केली आहे.
 एक तरुण निग्रो प्रवासात असताना त्याने आपल्या मित्राकडे मुक्काम केला. त्या मित्राने जेवणासाठी एक रानकोंबडी मारून तिचे पदार्थ केले होते. ह्या तरुण निग्रोला रानकोंबडी खाणे म्हणजे महापाप व त्याचे गंभीर परिणाम होतात असे त्यांच्या मांत्रिकाने सांगितले होते. ह्या तरुणाने आपल्या मित्रास ही कोंबडी रानकोंबडी नाही ना असे विचारले. तो मित्र म्हणाला, “छे छे! ही रानकोंबडी नाही, गावरान आहे.” त्या निग्रो तरुणाने तिच्यावर भरपूर ताव मारला. नंतर तो पुढल्या प्रवासाला रवाना झाला. यानंतर काही वर्षे गेली व जेव्हा त्या दोघांची परत गाठ पडली तेव्हा त्या मित्राने “आतातरी रानकोंबडी खाणार का?" असा प्रश्न विचारला. तेव्हा तो तरुण म्हणाला, "नाही. मला रानकोंबडी न खाण्याचे बंधन आमच्या मांत्रिकाने घातले आहे.” हे उत्तर ऐकून तो मित्र खदखदा हसू लागला. तो म्हणाला, “अरे काही वर्षांपूर्वी माझ्याकडे जी कोंबडी खाल्ली होतीस, ती रानकोंबडीच होती. इतक्या वर्षांत तुला काहीही झालेले नाही. मग आज काय होणार आहे? तू खुशाल खा."
 हे ऐकून त्या तरुणाला एवढा जबरदस्त धक्का बसला की तो भीतीने चळचळा कापू लागला व चोवीस तासांत त्याने प्राण सोडला. भारतात 'बालासिंग ची जी अवस्था झाली तीच त्या तरुण निग्रोची झाली. या दोन्ही हकीकतीत शास्त्रीय दृष्ट्या अथवा वैद्यकीय दृष्ट्या अशी घटना म्हणजे विज्ञानाला न पटणारी, बुद्धिवादात न बसणारी अशी असते, पण ती सत्य आहे हे सर्वांना माहीत असते. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानात याची उत्तरे सापडतात. वरील घटनांच्या अगदी विरुद्ध म्हणजे वैद्यकशास्त्राला अशक्य वाटणाऱ्या केसेस संपूर्ण बऱ्या होतात ह्या घटनाही अनुभवास येतात. व्यक्तीची अढळ श्रद्धा, ही कल्पवृक्षासारखी असते. मन जर चांगले चिंतन करेल तर चांगल्या गोष्टी घडतील. वाईटच विचार मनात घोळवत गेले तर वाईट घटना घडत असतात. आपल्या प्राचीन वाङ्मयातील काही उत्तारे पाहू -

"मंत्रे, तीर्थे, द्विजे, देवे, दैवज्ञे, भेषजे, गुरौ
यादृशी भावना यस्य, सिद्धिर्भवति तादृशी ॥ "
१८५