पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मंत्र म्हणजे नुसते शब्द, , तीर्थ म्हणजे पाणी, ज्योतिष, औषधे हे सर्व क्रियाशील केव्हा होते? त्यापासून सिद्धी कशी मिळते? तर तुमची भावना - श्रद्धा ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणेच फल मिळेल. असाच दुसरा श्लोक पाहू -

"वैद्याः वदन्ति कफपित्तमरुद् विकारान् ।
ज्योतिर्विदों ग्रहगतिं परिवर्तयन्ति ।
भूताभिषाङ् इति भूतविदो ब्रुवन्ति ।
प्राचीनकर्म बलवद् मुनयो वदन्ति ।"

 वैद्य म्हणतात की, वात-पित्त-कफ हे विकार उत्पन्न करतात; ज्योतिषी म्हणतात, ही ग्रहगती आहे; मांत्रिक म्हणतात, ही भूतबाधा आहे तर मुनी म्हणतात की पूर्वकर्मानुसार मिळणारे हे फल आहे. गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझी जशी भक्ती कराल तसे फळ मिळेल. म्हणजे शेवटी देह व मन यांत मन हेच अशा गोष्टींना कारणीभूत असते. मनातील अपरंपार विश्वास म्हणजेच श्रद्धा.
 'नॉर्मन कझिन' आपल्या पुस्तकात म्हणतात (१९८९) "Belief Becomes Biology" - तुमची श्रद्धा हीच तुमचे जीवनशास्त्र बनून जाते. आफ्रिकेत हो जी 'तांत्रिक' विद्या समजली जात असे तिला 'व्हूडू' (Voodoo) म्हणतात. त्याला 'ब्लॅक मॅजिक' (Black Magic) असेही म्हटले जाते. ही अघोरी विद्या आदिवासी, वनवासी, अशिक्षित अशा छोट्या छोट्या जमातींमध्ये सरसकट अस्तित्वात होती. त्यावर त्यांची अफाट श्रद्धा असे.

 या जमातीतील प्रत्येक व्यक्तीचे 'अस्तित्व', 'अहंभाव' त्या जातिबांधवांनी दिलेल्या मान्यतेवर अवलंबून असे. अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्याला जमातीने त्यांचा म्हणून ओळखावे ही भावना असतेच. जेव्हा त्याचे एखादे कर्म जाति - बांधवांच्या मान्यता नसलेल्या प्रकारात मोडे तेव्हा ती व्यक्ती जमातप्रमुखाच्या वा मांत्रिकाच्या हुकुमाप्रमाणे वाळीत पडे. त्याला कोणीही जवळ करत नसे, सर्व प्रकारची त्याची सामाजिक मान्यता नष्ट होई व त्याचा परिणाम मृत्यूत होत असे. परंतु यालाही काही अपवाद असतच. या शापवाणीनुसार प्रत्येक तथाकथित गुन्हेगार मृत्यू पावत असेच असे नाही. या व्यक्तीच्या बाबत ज्या मांत्रिकाने शापवाणी उच्चारली असेल त्याचा परिणाम दुसरा मांत्रिक दंड घेऊन नाहीसा करू शकत असे.

१८६