पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालासिंगच्या बाबत हेच घडले असावे. त्या काळी भुते, वेताळ यांनी धरलेले झाड म्हणजे तो व्यक्ती, समाजापासून तुटत असे. त्याचे सहकारी, मित्र, किंबहुना जवळचे नातेवाईकसुद्धा आत्यंतिक भीतीने वागत. यातूनच त्याला अति तीव्र औदासीन्य येऊन त्याचा अंत मृत्यूत होत असे. यातूनही काही व्यक्ती सुटत असत. काही मांत्रिक ही भुते उतरवत असत. अत्यंत प्राचीन काळी सुद्धा शाप व उःशाप ह्या क्रिया होत होत्याच, जनक राजाच्या दरबारात जीवनाच्या सर्व अंगांची निरनिराळे ऋषी चर्चा करत असत. याज्ञवल्क्य हा एक श्रेष्ठ ज्ञानी ऋषी होता. परंतु तो अतिशय तापट होता. त्याला विरोध सहन होत नसे. एका प्रसंगी याज्ञवल्क्याला दुसऱ्या ऋषीने विरोध केला व त्याचे म्हणणे खोडून काढले. याज्ञवल्क्याला हे सहन झाले नाही. त्याने त्या ऋषीला शाप दिला की " तू मला खोटं पाडतोस, तेव्हा तुझं मस्तक शरीरापासून गळून पडेल" आणि क्षणात त्या ऋषीचे शिर धडापासून वेगळे झाले.

 या सर्व गोष्टींचे हार्द एकच. आपण एकाकी होणार आहोत, आपले सहकारी आपणापासून दुरावणार आहेत, आपल्या सामाजिक 'अहं'चे अस्तित्वच नष्ट होणार आहे, या भीतीपोटी येणारे औदासीन्य एवढे जबरदस्त असे की त्यामुळे एक तर हृदयक्रिया बंद पडून लगेच मृत्यू येई किंवा बालासिंगप्रमाणे मनाने झुरून झुरून ती व्यक्ती मृत्यूला सामोरी जात असे. ही मनातून निर्माण होणारी भुते, कालानुसार निरनिराळी रूपे घेत असतात. विसाव्या शतकाच्या अखेरीस सुद्धा ही भुते वेगळ्या स्वरूपांत, वैयक्तिक व सामाजिक समस्यांमध्ये, दिसून येतात. आज कोणीही भानामती, तंत्र, मंत्र, शाप यावर विश्वास ठेवत नाही. तरीसुद्धा तेच परिणाम आपणास डोळे उघडे ठेवले तर दिसतात. आत्यंतिक भीतीपोटी हृदय बंद पडून मृत्यू येऊ शकतो हे आज सर्वमान्य आहे. गेल्या शतकाच्या द्वितीयार्धात प्रथमच 'त्रिमिती' चित्रपट आले तेव्हा एक प्रकारचा चष्मा लावून हे चित्रपट बघावे लागत. त्यातील पात्रे, प्राणी हे पडद्यातून आपल्या अंगावर येत आहेत असा भास व्हावयाचा. . एका चित्रपटातील सिंहाने बाहेर उडी मारल्याचे चित्र आले. तो सिंह आपल्याच अंगावर आला आहे असा भास होऊन एक स्त्री जागचे जागी मृत झाली. ही कहाणी वर्तमानपत्रांत आली होती. म्हणजे तिला झालेल्या भासाचे रूपांतर प्रत्यक्षातच जणू घडले असे तिला वाटले. ही मनाची कर्तबगारी.

१८७