पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण त्यातील सत्यता, चिंतन व मनाचा अभ्यास यातूनच जाणवते. ते म्हणत असत की मी दिवसभर रामनाम जपत असतो. हा रामच जणू त्यांच्या अंतर्यामी वसत होता व तोच त्यांना आदेश देत असे. हा राम म्हणजे अंतर्मन व अंतर्मनाची चेताशक्ती. आपल्या अंतर्मनात अखंड एक द्वंद्व चालू असते. योग्य आणि अयोग्य, पाप आणि पुण्य, सत् - असत्. प्रकृतीनुसार मनावर सत्शील विचारांचा प्रभाव जास्त असेल तर ते अहितकारक गोष्टी घडूच देत नाही. आणि जर दुष्ट विचारांचा प्रभाव असेल, पापी गोष्टीकडे ओढ असेल, तर साहजिकच तो मनुष्य अहितकारी गोष्टीच करत राहणार. पण ह्या द्वंद्वात चांगल्या विचारांचा प्रभाव असेल, तर ते आदेशही चांगले देते. आपली प्रकृती अशी म्हणून आपण वाईट आदेशांचेच पालन करत राहिलो तर आपली उन्नती होऊच शकणार नाही. यासाठीच हवी असते ती तपश्चर्या वा साधना. गांधींनी असे काहीही स्पष्टीकरण दिलेले नव्हते. तरीही हीच भूमिका यामागे असावी. प्रार्थनेत किती शक्ती असू शकते हे आपण पाहूच. गांधीजींना प्रार्थना अत्यंत प्रिय होती. तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भागच होता.  अगदी हीच स्थिती मागील काळात पाश्चिमात्य किंवा अगदी आदिवासी लोकांतही अस्तित्वात होती. यालाच त्यांनी वापरलेला शब्द म्हणजे 'गट फीलिंग्स्' (Gut Feelings). दक्षिण आफ्रिकेत एक 'होजा' (Xhosa) नावाची जमात आहे. त्यातील 'मोंगेझी टिसो' नावाचा एक चिंतक होऊन गेला. तो म्हणतो, "हे गोरे लोक समजतात की आपला संपूर्ण देह मेंदूच्या आदेशानुसार काम करतो. पण आमच्या भाषेत एक शब्द आहे. 'अंबेलिनी' म्हणजे पूर्णतः आंत्र वा आतडे. हे शरीरावर नियंत्रण करत असते. माझे 'अंबेलिनी' काय होणार आहे हे मला सांगते.तुम्हाला हा अनुभव कधीच आला नाही का?"

 कँडेस् बी.पर्ट ही न्यूरोसायन्स व ब्रेन केमिस्ट्रीची तज्ज्ञ.तिला एन्डॉर्फिनच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले होते. तिने काढलेले निष्कर्ष हे भावभावना- निर्मितीसंबंधी असलेल्या आपल्या दृढमतांची उलटापालट करून टाकतात.आपले मन हे फक्त मेंदूमध्ये कोठेतरी आहे, अशी आजपर्यंत वैज्ञानिकांची सुद्धा कल्पना होती. ती किती चूक होती हे तिने सिद्ध केले. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला मेंदू आहे, मन आहे. ज्याला जी.आय्. ट्रॅक म्हटले जाते तो म्हणजे मुखापासून सुरू

१८