पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि ते त्यांना माहीत असते. त्यांची रवानगी जेव्हा नर्सिंग होममध्ये किंवा वृद्धाश्रमात होते तेव्हा समाज, त्यांचे कुटुंब, नातेवाइकांची माया, प्रेम ह्या सर्व गोष्टींची दारे त्यांना बंद होतात व शेवटी ते त्या परिस्थितीला शरण येऊन मृत्यूला सामोरे जातात.
 आज ही लाट आपलेकडेही आली आहे. अर्थात अमेरिकेपेक्षा आपली कारण- परंपरा वेगळी आहे. काही वृद्ध ही परिस्थिती आपल्या वागण्याने ओढवून घेतात तर काही परिस्थितीचे बळी असतात. . सुरुवातीच्या काळात नातेवाईक, मुले अधून-मधून भेटून जातात. पुढे पुढे हा कालखंड, दीर्घ होत होत आपली माणसेच आपल्याला दुरावतात. समाज, नातेवाईक, अत्यंत जवळची मुलेसुद्धा कायमची दुरावतात. हा प्रकार म्हणजे आफ्रिकन 'व्हूडू' किंवा आपल्याकडील समाजाने वाळीत टाकणे असा शाप आहे. ह्यावरही उःशाप म्हणजे त्यांच्यावर कुणीतरी माया करणे, त्यांना प्रेम मिळत आहे, आपण आपल्या माणसांना हवे आहोत ही भावना निर्माण करणे. नाहीतर ते शापित जीवन नैसर्गिकपणे मिळालेला जीवनकालखंड खंडित करून त्या व्यक्तीला लवकर निजधामास पाठवते. अजूनही एका गोष्टीचा आनंद मानावा लागेल की आपली अद्यापही पूर्णपणे अमेरिका झालेली नाही. त्यांच्याप्रमाणे कुटुंबव्यवस्थेचा संपूर्ण अंत झाला नसून बहुधा आपली कुटुंब, समाज यांच्याशी असलेली नाळ पूर्णपणे तुटलेली नाही.
 आधुनिक काळातील आणखी एका उदाहरण म्हणजे नोकरीमध्ये येणारे नैराश्य. अतिशय वाढलेली लोकसंख्या, लक्षावधी तरुणांची बेकारी व मिळेल ती नोकरी पत्करावी लागत असल्याने केल्या कामात मिळणाऱ्या समाधानाचा अभाव. नोकरी- धंद्यात आत्यंतिक असमाधान म्हणजे अनेक समस्यांना द्यावे लागणारे तोंड. अमेरिकेत याला 'ब्लॅक मंडे सिंड्रोम' (Black Monday Syndrome) असेच नाव दिले गेलेले आहे. शनिवार व रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी कामावर जाणे म्हणजे जणू पापच. नोकरीत सातत्याने येणारे ताणतणाव अनेक कायिक व मानसिक रोग निर्माण करू शकतात हे आपण जाणतो. आता ताणतणावांचे व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा विषय निर्माण झाला आहे.

 इ.स. १९७२ मध्ये मॅसाच्युसेटस्मध्ये केलेल्या पाहणीत असे दिसून आले की

१८९