पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डॉ. जेम्समुल्लर यांनी केलेल्या अभ्यासात 'काळा सोमवार' हे उजेडात आले व एकूण पाहणीत असे आढळून आले होते की, हे आघात सकाळी ९ वाजता होत असतात. सुरुवातीस हे खरे वाटेना. परंतु बहुतांशी सकाळीच होत असतात असे पाहणीत दिसून आले. हे झाल्यावर मग प्रश्न उद्भवला की ही 'काळ्या सोमवारा'ची समस्या फक्त 'हृदयरोगाशी'च निगडीत आहे, का इतर गंभीर आजारांशीही निगडीत आहे? डॉ. मुल्लरबरोबर काम करणारा डॉ. पॉल लुडमर व मुल्लर यांना असे आढळून आले की ज्याला 'स्ट्रोक' असे म्हटले जाते त्याचे आघातसुद्धा त्या वारी येऊ शकतात. हल्ली कॉम्प्युटर म्हणजे रोज वापरात येणारी वस्तू. अमेरिकेत अशा अनंत गोष्टी कॉम्प्युटरच्या मेमरीत साठवल्या जातात. डॉ. मुल्लरना असे आढळून आले की हृदयविकाराचे आघात सोमवारी होतात त्यापेक्षाही 'स्ट्रोक'चे प्रमाण कितीतरी जास्त आहे. आणि हे आघात स. ८ ते ९ च्या दरम्यान जास्तीत जास्त असतात दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान सर्वात कमी असतात.
 या आघातामुळे मृत्यू किती होतात हा तिसरा प्रश्न डॉ. लुडमर समोर आला. मॅसाच्युसेटस्मध्ये १९८३ साली झालेल्या मृत्यूंची सर्टिफिकेटस् तपासल्यावर असे आढळून आले की सायंकाळी ५ चे सुमारास होणान्या मृत्यूंपेक्षा सकाळी ९ वा घडलेल्या मृत्यूंची संख्या दुप्पट होती.

 या घटनांच्या मुळाशी त्या काळात होणारे शारीरिक बदल कारणीभूत आहेत का याचा शोध सुरू झाला. त्याचा मार्ग म्हणजे जैविक रसायनशास्त्र (Bio Chemistry). संशोधकांनी शरीरामध्ये एका दिवसात काय बदल होत असतात हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना असे आढळले की, हे बदल नेहमी होत असतात व त्यांना सुद्धा एक ताल आहे, काळ, वेळ आहे. यालाच इंग्रजीमध्ये 'सरकॅडिअन ऱ्हिदम्' (Circadian Rhythms) असे म्हणतात. सर्वच मानवांचे सकाळी नाडी- ठोके व रक्तदाब जास्त असतो. याशिवाय सकाळी रक्तातील प्लेटलेटस् या जास्त चिकट असतात व त्यामुळे रक्तवाहिन्यांत गुठळ्या होण्याची शक्यता असते. अशा गुठळ्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांत किंवा मेंदूमध्ये जाऊन हृदयविकार किंवा स्ट्रोकचा आघात होण्याची शक्यता असते. शरीरात ॲड्रेनलिनसारखे रासायनिक स्राव जास्त निर्माण होत असतात. यामुळे सकाळी आघातांची शक्यता जास्त असते. पण हे

१९१