पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशी धारणा न होता पेशातील इतर चांगल्या गोष्टी म्हणजे 'भरलेला अर्धा प्याला' अशी धारणा अंगी बाणेल.
 (२) समस्यांचे नियंत्रण :
 येणाऱ्या समस्या येऊच न देणे हे काही आपल्या हातात नसते. परंतु समस्या या येणारच. जीवनाचे असे कोणते अंग आहे की ज्यात समस्या उद्भवतच नाहीत? असे विश्व आदर्श मानले तरी ते व्यवहारात असत नाही. सुख व दुःख, श्रेय व प्रेय, प्रेम व राग अशा निरनिराळ्या भावनांच्या जोड्याच अस्तित्वात असतात. हे जर मान्य असेल तर नोकरीपेशाचे विश्वही याला अपवाद असू शकत नाही. खासगी जीवनात येणाऱ्या समस्यांना आपण तोंड देतो, त्यावरील निरसनकारक उत्तरे शोधून काढतो, तीच मोजमापाची पट्टी नोकरीपेशातील समस्यांना लावता येईल हे उघड आहे. हेच नियंत्रण. एका अर्थी नियंत्रण हा विश्वासाचा, श्रद्धेचा भाग आहे. मानसशास्त्रज्ञ ‘ब्लेअर जस्टिस' म्हणतो, “The sense of control is largely belief”. ही श्रद्धा म्हणजे तत्त्वावरील दृढ विश्वास. जेव्हा तत्त्वज्ञानाच्या गाभ्यावर विश्वास ठेवून मनुष्याचे वर्तन घडू लागते तेव्हा अशा समस्या, असे ताणतणाव निर्माणच होत नाहीत.
 (३) समस्यांचे आव्हान व कार्यनिष्ठा :

 नोकरी पत्करणे म्हणजे ज्या कार्यासाठी नेमणूक झालेली असते त्यासंबंधीच्या आपणाकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आपण दिलेले आश्वासन असते. हे काही फक्त नोकरीबाबतच लागू नाही. अगदी बालपणापासूनच्या आयुष्याचे आपण सिंहावलोकन केले तर आयुष्याचा प्रत्येक क्षण म्हणजे एक प्रकारचे आव्हानच असते. बालपणी शाळेत जातो तेव्हा आपण उत्तम अभ्यास करून यशप्राप्तीचे आव्हानच स्वीकारत असतो. हे आव्हान शिक्षण संपेपर्यंत चालूच असते. पुढे चरितार्थाचे साधन व त्यातून जीवनाचा उपभोग घेणे यासाठी नोकरी वा धंदा. सुयोग्य वयात लग्न म्हणजे नुसताच शरीरउपभोग नव्हे. तर त्यातून येणाऱ्या जबाबदा-यांचे आव्हान आपण स्वीकारलेले असते. वृद्धापकालीही अशी अनेक आव्हाने आपल्या समोर येत असतात. ही आव्हाने आपण कशी हाताळतो यावर आपले यश, आपला जीवनाचा आनंद अवलंबून असतो. पण जीवन हीच एक नदी

१९३