पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा घेतल्या आहेत.
दमा - शारीरिक किती व मानसिक किती?
 दमा (Bronchial Asthma) म्हटले की जे व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे सतत खोकल्याची ढास, श्वास घेताना व सोडताना येणारा सूं 5 सूं असा आवाज, कफ वगैरे. दमा हा कधीही बरा न होणारा रोग आहे असे म्हटले जाते. त्याची कारणे म्हणजे आनुवंशिकता, शारीरिक अशक्तता, हवेतील पोल्युशन व वश्यता (Allergy). यातील आनुवंशिकता हा जर महत्त्वाचा घटक धरला तर दमेकरी जोडप्याची मुले व पुढील पिढ्या मोठ्या प्रमाणावर दमेकरी व्हावयास पाहिजेत. तसे होत नाही. ज्या पुढील पिढीतील व्यक्तींना तो होत नाही तो का होत नाही इकडे कोणाचेच लक्ष नसते. दमा झाल्यावर तो फक्त आटोक्यात कसा ठेवावयाचा व शारीरिक लक्षणानुसार काय औषधे द्यावयाची, श्वासनलिकांना फवारे (Nebulizer) मारून त्यांची श्वास न पुरण्याची अवस्था श्वासनलिकांचा अंतर्भाग विस्तारित करून कमी करावयाची हेच वैद्यकशास्त्रातील उपचार. परंतु दमा मानसिकही असू शकतो व कोठल्याही परिस्थितीत दमा रुग्णाची मानसिकता बदलून बरा होऊ शकतो, यावर विश्वास बसणे वैद्यकशास्त्राला मान्य नाही. मनाच्या शरीरावरील स्वामित्वाची कल्पना येण्यासाठी काही कहाण्या पाहू. या संत्यघटना आहेत.

 (१) शीला (नाव काल्पनिक) ही मूळची जम्मूची. आईवडील व इतर जवळचे नातेवाईक हे काश्मीरात राहत होते. तिचे लग्न नंतर केंद्र सरकारातील एक वरिष्ठ अधिका-याबरोबर झाले. पती व पत्नी दोघेही काश्मिरी. तेव्हा दरवर्षी एकदा जम्मूला जाऊन तेथे आईवडील व इतर नातेवाइकांना भेटणे, सणवार साजरे करून परत दिल्लीस परतणे हा त्यांचा वार्षिक कार्यक्रम. पण शीला जम्मूला जावयाचे म्हटले की थोडीशी घाबरू लागली होती. कारण जम्मूला गेले की दमा होतो ही भीती. पुढे पुढे ही प्रवृत्ती वाढत जाऊन जम्मूमध्ये पाय ठेवला की तिला दम्याचा जोरदार आघात व्हावयाचा. त्यामुळे जम्मूला गेले की औषधोपचार, विश्रांती यांत घरी गेल्याच्या आनंदावर विरजणच पडावयाचे. ही जी वश्यता (Allergy) निर्माण झाली होती ती केव्हा, कशी व का? याला पती, आईवडील यांचेकडे उत्तरच

१९५