पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हते. डॉक्टर दम्याचा तीव्र आघात म्हणून उपचार करावयाचे. त्यांच्याकडे या 'का?' या प्रश्नाचे अर्थातच उत्तर नव्हते. जम्मूची हवा मानवत नाही वा तिथली थंडी मानवत नाही म्हणावे तर जन्म तिथला, शिक्षण तेथेच, विवाहही जम्मूतव झाला. पतीच्या नोकरीमुळे तिला दिल्लीला जावे लागले.
 एका वर्षी जम्मूस जाताना ती विमानात निद्राधीन झाली. काही कारणामुळे विमान जम्मूस गेलेच नव्हते. जेव्हा तिला जाग आली तेव्हा विमान जमिनीवर उतरले असून आता आपण जम्मूत पोहोचलो ही तिची भावना झाली. आपण जम्मूत पोहोचलो ह्या कल्पनेतूनच तिला दम्याचा जोरदार आघात आला. ती घाबरीघुबरी झाली. दम लागला. मग नेहमीची औषधे, घडशावाटे फवारा हे सुरू झाले. नवराही चकित झाला. त्याने आपण अद्यापि जम्मूला पोहोचलो नसून काही कारणामुळे वाटेतच विमान उतरवावे लागले आहे असे शीलाला सांगितले. जम्मूला पोहोचावयाची वेळ निश्चित नाही हे समजतात तिचा दमा नाहीसा झाला. याचा अर्थ आहे की मनाने एक गोष्ट गृहीत धरली की शरीरही त्याला अनुरूप स्थिती निर्माण करते.

 (२) माधवी ही एक सुखी गृहिणी. मुळात तिला दमा नव्हता. तो केव्हा सुरू झाला हे तिला आठवत नव्हते. परंतु दम्याचा तीव्र असा झटका कधी आलेला नव्हता. घर व्यवस्थित. बागकामाची आवड. घरच्या दिवाणखान्यात पाळलेल्या माशांची एक काचपेटी. तिच्या संग्रही लाल रंगाचे मासे नव्हते. ते तिने पैदा करून त्या काचपेटीत आणून सोडले. त्या दिवशी 'कावळा बसायला अन् फांदी मोडायला एक गाठ पडली' या म्हणीप्रमाणे तिला दम्याचा इतका तीव्र झटका आला की तिला हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले, त्या दिवशी तिच्या मनाने घेतले की लाल मासे आपले शत्रू. ते आपल्याला दर्शनाने सुद्धा दम्याचा झटका आणू शकतात. ही कल्पना दृढ झाल्यावर दुसरीकडे गेल्यावर लाल मासे पाहून तिला दम्याचे झटके येऊ लागले. यावर तोडगा शोधण्यासाठी तिच्या अनुभवी डॉक्टरांनी एक प्रयोग केला. आपल्या क्लिनिकमध्ये माधवीच्या घरी होती तशीच माशांची पेटी आणून ठेवली. इतर जिवंत माशांबरोबर खोटे लाल मासेही आत सोडले. ठराविक कालानंतर ती या डॉक्टरांकडे रुटीन चेकअपला जात असे, तोच दिवस ह्या प्रयोगासाठी डॉक्टरांनी ह्या

१९६