पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निवडला. माशांची ती काचपेटी व आतील लाल मासे पाहून तिला दम्याचा तीव्र झटका आला. डॉक्टरांनी उपचार करून तिला ते मासे खोटे असल्याचे सांगितले. तिचा विश्वास बसेना. तेव्हा डॉक्टरांनी ते मासे बाहेर काढून टेबलावर ठेवले. तेव्हा आपला दम्याचा झटका हा मानसिक आहे हे तिला पटले.
 (३) ही कहाणी अमेरिकेतील आहे. जेनी ही दम्याचा विकार असलेली तरुणी. वय सत्तावीस वर्षे. लॉस एंजेलिसमधील काऊंटी जनरल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होती. तिला मानसोपचाराचीही जरुरी आहे हे ध्यानात आल्यावर तिला त्या हॉस्पिटलच्या मानसोपचारांच्या डॉक्टरकडे पाठवण्यात आले. हा डॉक्टर नुकताच एम्. डी. होऊन इंटर्न म्हणून काम करत होता. त्याचे पहिलेच वर्ष होते. मुलाखतीला सुरुवात झाली. जेनीने विचारले, "तुम्हाला काय माहिती पाहिजे? माझा विकार सुरू झाला तेव्हापासून?" तो डॉक्टर म्हणाला, "अर्थातच. आमच्या शास्त्राप्रमाणे डॉक्टरला सर्व समजावयास पाहिजे.” त्याला एवढेच माहीत होते की जेनीचे आयुष्य अतिशय गुंतागुंतीचे व बिकट, सतत काही ना काही समस्यांना तोंड द्यावे लागणारे असे गेलेले होते. जेनी सांगू लागली -
 " मी जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही आरकान्ससमध्ये राहत होतो. माझी आई मोठी धार्मिक वृत्तीची होती व तिने आम्हाला बॅप्टिस्ट पंथाच्या शिकवणीनुसार वाढवले. मला माझे वडील कोण, ते काय करतात, कोठे राहतात यांची काहीच माहिती नव्हती. त्यांचा ठावठिकाणा कोणालाही माहीत नव्हता. खरं सांगायचं तर माझ्या आईवडलांचं लग्नच झालं नव्हतं असं मला वाटतं. मी जेव्हा शाळेत जाऊ लागले तेव्हा 'बेबी सीटिंग' करून थोडेफार पैसे मिळवू लागले. तेथे त्या बालकाची आई माझ्याशी फारच चांगली वागत असे. पुढे मी कॅलिफोर्नियामध्ये गेले, तरी सुद्धा त्या बाई मला अधूनमधून थोडे फार पैसे पाठवत असत. तेथून मी लॉसएंजेलिसला आले. माझ्या मूळच्या दम्यात येथे खूपच सुधारणा झाली.” या वेळी त्या डॉक्टरने तिला प्रश्न केला, "जेनी, तू कॅलिफोर्नियामध्ये का गेलीस ? आपल्या प्रकृतीमुळेच ना?"

जेनी म्हणाली, “तेच काही एकमेव कारण नाही. परंतु सगळ्या खासगी गंभीर गोष्टी सांगितल्याच पाहिजेत का?" यावर डॉक्टर म्हणतो, " अर्थातच. मूळ

१९७