पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इतिहासच माहीत नसेल तर मी काय सल्ला देणार व उपचार कसे करणार? तुझं मन अगदी संपूर्ण हलकं कर व जे जे घडलं ते ते न लपवता स्पष्ट सांग.'
 जे सांगते, "आरकान्ससमधील त्या छोट्या शहरात माझी एका तरुणाशी ओळख झाली. हळूहळू दृढसंबंध निर्माण झाले. त्यातून मी गर्भवती झाले. माझी आई संतापाने वेडी झाली. तिला मी व माझे मूल यांतले काहीच नकोसे झाले. आम्हापासून तिला सुटका पाहिजे होती."
 डॉक्टर विचारतो, " पण त्या मुलाच्या बापाचं काय?" जेनी म्हणाली, "तो एक नालायक माणूस होता. मी जर त्याचे नाव उघड केले तर मला जिवे मारण्याची त्याने धमकी दिली. आणि मी लॉस एंजेलिसला गेल्यावर सुद्धा तेथे येऊन माझा जीव घेण्याची धमकी त्याने दिली. भीतीपोटी मी कुणाचीही - अगदी सहज मिळणारी सरकारी मदतही घेतली नाही. मला माझ्या गावची ती बाई मात्र अधूनमधून आर्थिक मदत करावयाची. त्यामुळे लॉसएंजेलिसमध्ये मी ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. माझे दोन भाऊ लॉस एंजेलिसमध्येच येऊन नोकरी करत होते. पैसे वाचावेत म्हणून मी त्यांच्या बरोबर राहू लागले." मानसशास्त्रज्ञाने विचारले, "मग तू शिक्षण पूर्ण केस का ? " हे सर्व सांगत असताना जेनी अतिशय क्षुब्ध झाली होती. ती म्हणाली, "मी भावांच्या बरोबर राहू शकत नसल्याने मला वेगळं व्हावं लागलं. ' मानसोपचारतज्ज्ञाने तिला यांचे कारण विचारल्यावर तिने विचारले की, "हे सांगायला पाहिजे का?" तो तज्ज्ञ म्हणतो की, होय, त्याशिवाय तो पूर्ण उपचार करू शकणार नाही. जेनी दुःखातिशयाने रडू लागली. ती म्हणाली, "माझा एक भाऊ रोज माझ्या अंगझटी यावयाचा. एकदा तर त्याने माझ्यावर बलात्काराचाही प्रयत्न केला. यामुळे मी अर्थातच वेगळी राहू लागले. उपजीविकेसाठी मला नोकऱ्या कराव्या लागल्या म्हणून मी कॉलेज सोडून दिले. कारण वेळच पुरत नसे. "

 तो डॉक्टर विचारतो, "त्या वेळी तुझा दमा कसा होता?" जेनी म्हणते की, "माझा दमा अतिशय वाढला होता. त्यामुळे वारंवार मला हॉस्पिटलमध्ये जाऊन राहावे लागे. साहजिकच माझी नोकरी सुटे व नवी शोधावी लागे." एवढे बोलणे झाल्यावर तिला दम्याचा अतिशय तीव्र झटका आला. तिने पर्समधून मुखावाटे घ्यावयाच्या फवाऱ्याची बाटली काढली (Isuprel Nebulizer) व फवारा घेतला.

१९८