पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होऊन गुदद्वारापर्यंतचा मार्ग. ह्या सर्व भागाच्या आत अशा पेशी आहेत की ज्यांत न्यूरोपेप्टाइडस् व रिसेप्टर साइटस् आहेत. यामुळेच याला 'गट फीलिंग' (आंत्र भाषा असे म्हणूया) म्हणतात. कँडेस पर्ट म्हणते, "या मार्गातील 'रिपेप्टर्सची' उच्च स्थितीच याला जबाबदार असतात म्हणूनच अनेक लोकांना ही 'गट फीलिंग' येत असते. आजच्या युगातील हायपर अ‍ॅसिडिटी , अल्सर्स, गॅस्ट्रायटिस, अपचन, गॅसेस, पोटशूळ व रक्तस्राव हे सर्व म्हणजे आपण या अन्नमार्गावर (G.I. Track) आपल्या सर्व ताणतणावांचे नको एवढे ओझे लादत असतो त्याचा परिणाम. फक्त पोटाशीच संबंध नसून संपूर्ण अन्नमार्ग याचा बळी होतो. असे म्हटले जाते की अमेरिकेत यामुळे अल्सर व रक्तस्राव होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडतात. काही पेप्टाइड हार्मोन्स फक्त अन्नमार्गातच निर्माण होतात अशी जी एक कल्पना होती ती अर्धसत्यच होती. कारण अगदी असेच हार्मोन्स मेंदूमध्येही निर्माण होतात. अशा अनेक नवनवीन शोधांमुळे विज्ञानवादी संशोधकांना असा एक तात्त्विक प्रश्न पडला आहे की यामागे तत्त्वज्ञानातील सखोल विचार तर लागू पडत नसतील? मेंदू आणि अन्नमार्ग एकाच तऱ्हेचे हार्मोन्स निर्माण करत असतात. एका अर्थी हे हार्मोन्स म्हणजे रासायनिक दूत व रिसेप्टर साइटस् म्हणजे दूताकडून संदेश घेणाऱ्या जागा. मग शरीरात मेंदू हा कर्ता करविता का अन्नमार्ग? का आणखीनच एखादा श्रेष्ठी जणू राजाच आहे असा काही अवयव, जो आपल्याला ज्ञात नाही? आणि मनच जर अंती श्रेष्ठ आहे तर ते मेंदूत आहे म्हणणे किती बरोबर? ते जर मेंदूत असेल तर ते अन्नमार्गामध्येही आहे. एकमेकांशी संवाद करणाऱ्या सर्व पेशींमध्ये आहे. तेव्हा मनाला आपल्या शरीरात असे काही विशिष्ट स्थान नाही, हे विज्ञानानेही सिद्ध झाले आहे, असे म्हणावयास हरकत नाही.

 आपल्या अवयवांना सततच लक्षणाद्वारा होणारे ज्ञान किंवा जाणीव (Sensation) ही अत्यंत अविश्वासार्ह असते. हृदयविकाराचा त्रास होऊ लागतो तो प्रत्यक्ष हृदयाशी कधीच संबंधित नसतो. ह्या वेदना डावा खांदा, मान, जबडा, एवढेच नव्हे हात व कोपर यामध्येही असू शकतात. उलट प्रत्यक्ष हृदयाचे जागी दुखू लागते तेव्हा त्याचा हृदयरोगाशी काहीही संबंध नसतो. लढाईत प्रत्यक्ष जखमी होणारे जवान, त्यांना आपला हात, पाय असा अवयव तुटला आहे, मोडला आहे याची जाणीवही नसते. मग आपल्याला जाणवणारी लक्षणे, भावभावना, त्यांच्यांत

१९