पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा फवारा घेताच तिला शरीरभर पेटके (Cramps) आले, झटके (Spasms) येऊ लागले. काही क्षणांतच ती बेशुद्ध पडली आणि लगेच इंटेंसिव्ह केअर युनिटमध्ये तिला नेण्यात आले. पण काहीही उपयोग झाला नाही. काही क्षणांतच ती मृत झाली. आय्.सी.यू.मध्ये नेण्यापूर्वी ती एवढेच म्हणाली होती, "हे असलं जीवन जगण्यापेक्षा मरण बरं.” तिचे हे मरण तिच्या भूतकाळातील आठवणी उकरून काढून जणू ते जीवन तिला परत जगावे लागले असे तिला वाटले. हे अत्यंत शरमेचे व लाजिरवाणे जीवनच तिला नकोसे झाले आणि आजाराने नव्हे तर मानसिक आघाताने तिला मृत्यू आला.
 या आपण तीन निरनिराळ्या केसेस पाहिल्या. शेवटची केस म्हणजे 'नको ते लज्जास्पद जीवन' या विचारातून आलेला मृत्यू. या सर्व कहाण्या एकच सत्य सांगतात - भीती, खेद, अपमान, अतिआनंद या प्रकारची कोठलीही तीव्र मनःस्थिती मृत्यू घडवून आणू शकते. याला आपण भावनिक आघाताचे मृत्यू म्हणू शकतो. याज्ञवल्क्य ऋषीने दिलेल्या शापामुळे तो ऋषी जागच्या जागी मृत झाला. शाप - उःशापाच्या अनंत कथा आपल्या पुराणांत, उपनिषदांत आढळतात. दुष्यंत-शकुंतला यांची कहाणी, दशरथ राजा रामाला वनवासात पाठवावा लागल्याने काही दिवसांतच मृत्युमुखी पडला. अशा शाप - उ:शाप, विरह, सामाजिक बहिष्कार वगैरेमुळे झालेले मृत्यू आपल्याला माहीत आहेत. पण या कहाण्या फक्त आपलेकडेच घडलेल्या नाहीत. ख्रिस्तकाळात अशा कहाण्या घडलेल्या आहेत. बायबलमध्ये सांगितलेली कहाणीच पाहू. अनानिआसूला खोटे बोलण्याचा आरोप करून पीटर म्हणतो, "तू माणसाशीच खोटे बोलला नाहीस तर तू परमेश्वरापाशीही खोटेपणाने वागलास. हे मोठे पाप आहे." पीटरची ही वाणी ऐकून अनानिआस उन्मळून कोसळळा व मृत झाला. अनानिआसची पत्नी साफिरा. तिला पीटर म्हणतो, "ज्या व्यक्तींनी अनानिआसला जमिनीत पुरले, त्यांची पावले आता तुझ्याकडे वळली आहेत. लवकरच त्या व्यक्ती तुलाही तेथेच घेऊन जातील.” हे ऐकून साफिराही मृत्यू पावली. नर्व्हा हा राजा त्याच्याच सीनेटरने त्याचा अपमान केल्यामुळे इतका संतापला की क्षणात मृत्युमुखी पडला. पोप इनोसन्टच्या सैन्याचा मानफ्रेडने पराभव करून पोपलाच अपमानकारक स्थिती आणली. पोपला इतके पराकोटीचे दुःख झाले की क्षणात उन्मळून पडला. अशा अनंत कहाण्या प्रसिद्ध आहेत.

१९९