पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्याकडील देवांच्या कल्पनेत सुद्धा 'कल्याणकारी' व 'भयकारी' असे भेद होतेच. भले ते काल्पनिक असोत. पण कालीमाता, गाववेशीवर स्थापन केलेल्या देवता अशा अनेक देवतांच्या कोपामुळे माणसाचे आयुष्यच बरबाद होऊ शकते यावर अशिक्षितांची कमालीची श्रद्धा होती. यातून निर्माण होणारे आजार व मृत्यू यांना भावनिक बळी असे म्हणता येईल.
 दमा हा रोग प्राकृतिक आहे. दमेकरी अगदी दीर्घकाळही जगू शकतात. पण आधुनिक औषधे अनेक नव्या समस्या निर्माण करतात. परंतु नियमित व्यायाम, प्राणायाम व साधी साधी औषधे यांनी तो बरा होऊ शकतो. योगामुळे मनःस्वास्थ सुधारते. आरोग्याचे हेच 'हार्द' आहे.
 मनाचे कार्य कल्पनेच्या किती पलीकडचे आहे हेच या कथा आपल्याला सांगतात. जुन्या नको त्या आठवणी, जुन्या अनुभवांची पुनरावृत्ती म्हणजे तेच हाल, अशा या गोष्टी. स्वप्नांत आपण अनेक गोष्टी पाहत असतो. काही भीतिदायक स्वप्नांतून आपण जागे होतो, हृदय धडधडत असते, अंगाला घाम आलेला असतो. पण हे स्वप्न होते हे समजल्यावर मन शांत होते, आपण रोजचे जीवन जगू लागतो. परंतु वरील कहाण्या म्हणजे जणू जागृतावस्थेतील स्वप्ने, जी सत्य वाटून शारीरिक दुःखाला सामोरे जावे लागते. जेनीची कहाणी तर सर्वांत अघटित, अत्यंत खेदजनकच म्हणावी लागेल. मानसशास्त्रज्ञाला आपली जीवनकहाणी सांगत असताना जणू तो भूतकाळ आपण आज या क्षणी जगत आहोत असाच तिला भास होत होता. प्रत्येक वेळी ती आठवण तिला त्रास देत असावी. यातून सुटका म्हणजे मृत्यूला आवाहन.

 कॅन्सर व हृदयविकार यांच्याही अशा अनंत कहाण्या सांगता येतील. नमुना म्हणून कॅन्सरची एक अमेरिकेतील व एक भारतीय कहाणी पुढे पाहू. इथपर्यंत आपण फक्त मानसिकतेमधून झालेले मृत्यूच पाहिले. परंतु मनाची शक्ती - अत्यंत श्रद्धा ही अमृतवेलाचेही काम करू शकते. तत्पूर्वी हृदयभग्नता किती भयानक आघात करू शकते हा आघाताचा प्रकार पाहून नंतर श्रद्धा किती कल्पनातीत चांगले कार्य करू शकते हे पाहू, म्हणजे श्रद्धेचे महत्त्व कळेल.

२००