पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हृदयभग्नता : (Broker Heartedness) :
 काही काही प्राणी किंवा पक्षी पारतंत्र्यात जगूच शकत नाहीत. त्यांना पकडून पिंजऱ्यात ठेवले तर त्यांना कितीही उत्तम आहार द्या, त्यांची बडदास्त राखा, हळूहळू पण निश्चितपणे मरण पत्करत असतात. मानवांचे बाबत सुद्धा हे होऊ शकते. पूर्वी गुलामांचा व्यापार चालत असे. आफ्रिकेतील अनेक निग्रो पकडून त्यांना अमेरिकेत नेऊन विकले जाई. डेव्हिड लिव्हिंगस्टन हा स्कॉटिश डॉक्टर व मिशनरी. त्याने मध्य आफ्रिकेचा तपशीलवार अभ्यास केला होता. त्याच्या आत्मचरित्रात तो म्हणतो, "येथे मला एक अत्यंत चमत्कारिक विकार आढळून आला. मुळात तगडे, काहीही आजार नसलेले निग्रो रहिवासी जेव्हा पकडले जात व गुलाम म्हणून विक्रीसाठी नेले जात, तेव्हा त्यांच्यापैकी बरेच लोक खचून, हळूहळू निःशक्त होऊन, दर्शनी कोठलाही आजार नसताना मृत्युमुखी पडत. " लिव्हिंगस्टनने यातील अनेक जणांची चौकशी केली असता त्यांनी आमच्या हृदयात खूप दुखत आहे असे सांगितले व बरोबर हृदयावर हात ठेवला.

 हृदयभग्नता ही ऐतिहासिक काळीच नव्हे तर आधुनिक काळातही आढळून येते. काही पक्षी व काही प्राणी हे जन्मभर जोडीदार म्हणून वावरतात. ते खऱ्या अर्थाने वैवाहिक जीवनच जगत असतात. अशा पक्ष्यांच्या जोडीतील एक जोडीदार मृत्यू पावला तर दुसरा काही दिवसांतच मृत्युमुखी पडतो. अर्थात अशा जोड्या विरळाच. आपण ज्याला प्रेम, एकमेकांची ओढ व मानसिक बंधन असे म्हणतो, ही खरे तर मानसिक अवस्था असते. पण ही भावना उन्नत मन दाखवते. ही जेव्हा सत्य असते तेव्हा या जोडीतील एका व्यक्तीला झालेले दुःख, इजा, अपघात अशा गोष्ट दुसऱ्या व्यक्तीलाही तितक्याच तीव्रतेने अनुभवास येतात. तो जोडीदार खूप दूरवर गेलेला असो व प्रत्यक्ष कोठलीही बातमी नसली तरी त्या पहिल्या व्यक्तीला तो अनुभव येऊ शकतो. अशा कहाण्या भारतात अनेक घडलेल्या आहेत. आपण त्या लिखित स्वरूपात ठेवलेल्या फारशा आढळत नाहीत. परंतु पाश्चात्य राष्ट्रातील व्यावसायिकांनी, संशोधकांनी त्या लिहून ठेवल्या आहेत. एवढेच नव्हे तर हे असे का होत असावे याबद्दल संशोधनात्मक लिखाणही करून ठेवलेले आहे. नमुना म्हणून आपण अशा काही कहाण्या पाहू......

२०१