पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आर्थर सेव्हर्न हा एक उत्तम चित्रकार. त्याच्या पत्नीचे नाव जोन. ही दोघेही प्रत्यक्ष जीवनात जणू एकरूपच झाली होती. ही हकीकत - ही कहाणी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस घडलेली आहे. आर्थरला बोटिंगचा अतिशय नाद होता. एक दिवस पहाटे तो त्याच्या गावाच्या शेजारच्या तळ्यात बोटिंगसाठी गेला. त्याची पत्नी जोन त्या वेळी गाढ झोपेत होती. सकाळी ७ वाजता जोन दचकून जागी झाली. झोपेत तिला असा भास झाला की आपल्या तोंडावर कशाचा तरी जोराचा फटका बसला आहे व त्यामुळे वरच्या ओठातून रक्त वाहत आहे. जागी होताच तिने हातरुमालाने ते रक्त टिपून घेण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्य की रुमालाला रक्ताचा एक थेंबही आला नाही. शांतपणाने ती परत झोपी गेली.
 सकाळी ९.३० च्या सुमारास नाष्ट्यासाठी आर्थर परत आला. पण तो जाणून- बुजून दूर बसला. त्याला काहीतरी लपवावयाचे होते. अधूनमधून तो हातरुमालाने तोंड पुसत होता. जोन म्हणते, "आर्थर, हे तुझं काय चाललंय? मला माहीत आहे की तुला काहीतरी इजा झाली आहे व ती तू लपवत आहेस." आर्थर सांगतो, "मी नौकाविहार करत असताना अचानक एक तुफान आले. नौका गोल गोल फिरू लागली आणि माझ्याच वल्ह्याचा मला तोंडावर फटका बसला. तेव्हापासून माझ्या वरच्या ओठातून रक्त येतंय. आणि ते थांबत नाहीयाय. "
 जोन म्हणाली, "आर्थर, त्याच वेळी मला स्वप्नात दिसले की माझ्या तोंडावर जोराचा फटका बसला आहे व रक्त वाहत आहे व मी जागी झाले. रुमालाने ओठ टिपला पण तो कोरडा होता. प्रत्यक्ष रक्त मात्र आले नाही. पण ती भीतीची भावना लगेचच गेली, आणि मी परत झोपी गेले."
 एकमेकांशी एकरूप झालेले जोडीदार एकमेकांच्या सुख-दुःखाची प्रत्यक्ष न पाहताही अनुभूती घेऊ शकतात. ही दुसरी कहाणी पाहू या.

 ही कहाणीसुद्धा एका अमेरिकन पत्नीचीच आहे. ती पत्नी सांगते, “१९४९ सालची गोष्ट आहे. माझा पती आमच्या डलसच्या निवासस्थानातून त्याच्या धंद्याच्या कामानिमित्त बोस्टन - वॉशिंग्टन अशी ट्रिप करावयास गेला. बोस्टन ते वॉशिंग्टन हा प्रवास विमानाचा होता. तो गेल्यावर मला काहीही कारण नसताना हा काही घरी परत सुखरूप येणार नाही असे तीव्रतेने वाटू लागले. दुसऱ्या दिवसापर्यंत

२०२