पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नैसर्गिकपणे 'एंडोर्फिन'ची ग्रहणकेंद्रे असतात, त्यांची नीट वाढच होत नाही. असेही आढळून आले आहे की, सर्व प्राणी यामध्ये मानवही अपवाद नाही, त्यांची अपत्ये मातेपासून तुटली तर एक प्रकारची मदतीची याचना करणारा दुःखद सूर काढू लागतात. त्याला प्रतिसाद म्हणून त्या मातेच्या मेंदूतही असे स्राव सुरू होतात व ती पिल्लाच्या संरक्षणासाठी धावून जाते. प्राण्यांच्या बाबत अशी अनेक उदाहरणे सांगितली गेलेली आहेत. वाघिणीला जर बच्चे असतील तर ती अतिशय आक्रमक बनते. आपल्या पिल्लांना धोका आहे, अशा विचाराने ती हल्ला करते. जंगलात अनेक माणसे पूर्वी अशी जखमी झाली किंवा मृत्यू पडलेली आहेत. हरिणीसारखी अतिशय निरुपद्रवी भित्री माता अपत्याचे रक्षण करण्यासाठी वाघावरही धावून गेल्याची उदाहरणे आहेत. त्यात अनेक वेळेला मातेला जीव गमवावा लागलेला आहे.
 ही जी एकरूपता किंवा जवळीक वांशिक व दैहिक असते ती आपण जाणतो. भूक लागल्यावरच मूल रडते असे नसून परक्या माणसाने त्याला घेतले तरी ते रडू लागते. आणि मातेने त्याला जवळ घेतले की क्षणात त्याचे रडणे बंद होते. हा स्पर्श त्या अजाण बालकाला कसा कळतो? या बालकाची आईपासून ताटातूट झाली तर त्याचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो याची एक कथा प्रसिद्ध आहे. सिसिलीचा राजा फ्रेडरिक (दुसरा) याने अशी काही मुले आयांपासून तोडून ती दायांच्या जवळ संभाळण्यास दिली. सूचना अशी की या मुलांचे खाणे-पिणे-आजार यांची सर्व काळजी घ्यावयाची, पण त्यांच्याशी बोलावयाचे मात्र नाही. पुढे ही मुले कोणती भाषा बोलू लागतात हे त्याला पाहावयाचे होते. घरातील भाषाच ती मुले का बोलतात हे त्याला कळत नव्हते, म्हणून हा प्रयोग. हा प्रयोग पूर्णपणे फसला. ही सर्व मुले मृत्युमुखी पडली.

 हा जवळिकेचा संबंध बालकाची वाढ होईपर्यंत अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या मुलांना आपल्या मातेप्रमाणेच आपल्यावर माया करणारी माणसे ओळखता येऊ लागतात. घरातील आजी, आत्या किंवा काका-काकू, जे जे त्याला मायेने वाढवतात, खेळवतात त्यांना ही बालके सहज प्रतिसाद देतात. अगदी लहानपणी काहीही समजत नसताना "अडगुलं मडगुलं" किंवा "चांदुमामा चांदुमामा" .

२०५