पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशी निरर्थक गाणीही शब्द न कळता त्यातील आवाजाच्या मायेने त्यांना आवडतात. थोडी मोठी झाल्यावर काही शब्द, खायला देताना "हा घास काऊचा " - असे लाडाने म्हणणे त्यांना भारी मानवते. आई किंवा इतर प्रेमळ माणसाने रागावून चापट मारली तरी आपलेच चुकले असावे असेच जणू समजून ती त्या व्यक्तीला जास्तच चिकटतात. त्यामुळे बालकांना संगोपनात मधुर भाषा व जवळीक यांची जरुरी असते. प्राण्यांत सुद्धा हा प्रकार आढळतो. बच्च्यांना आईने चाटून साफ केले की ती खुश असतात. व्रात्यपणामुळे जर आईने शिक्षा केली तर ते बच्चे एकदम अंग चोरून आईला जास्तच बिलगतात. ह्या घटना सर्व सस्तन प्राण्यांमध्ये आढळून येतात. ह्या संबंधाचा जर एकदम अंत झाला तर जो अवसाद (Dispair) व दुःख होते त्याचे शास्त्रीय कारण काय? यावरही संशोधन झाले आहे.

 अशा ताटातुटीमुळे जे दुःख, नैराश्य व अवसाद (Depression) या मानसिक अवस्थेत पहिला आघात होतो, तो आपली स्वसंरक्षणयंत्रणा व प्रतिकारक्षमता यावर. आपल्या शरीरात 'टी' (T) व 'बी' (B) या पेशी महत्त्वाच्या असतात. त्यावरच आपली स्वसंरक्षणक्षमता अवलंबून असते. स्तनाचा कर्करोग झालेल्या पंधरा स्त्रियांच्या नवऱ्यांची ही क्षमता हा अभ्यासाचा विषय. या सर्व गृहस्थांची पत्त्यांच्या मृत्यूपूर्वी या दोन पेशींची क्षमता उत्तम होती. पण त्यांच्या पत्त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना झालेले दुःख बरेच महिने टिकले. त्या काळात 'टी' व 'बी' पेशींची संख्या पूर्ण असूनही त्या पेशी कामच करेनाशा झाल्या होत्या. त्यांचे रक्त काढून परीक्षानलिकेमध्ये या पेशी कार्यरत करणारी रसायने घालूनही त्या निष्क्रियच राहिल्या. आधुनिक शास्त्रानुसार ही स्थिती येण्यासाठी काहीतरी 'दैहिक' कारणे असावी लागतात. मानसिक कारणांनी हे होऊच शकत नाही. या ताटातुटीमधून फारतर तो माणूस भ्रमिष्ट होईल, स्वतःची काळजी घेणार नाही, जेवणखाण कमी होईल, औषधोपचाराला ते नकार देतील व औषधे घेणार नाहीत. पण सत्य असे आहे की ही स्थिती येण्यास कारण मनच असते. ती व्यक्ती अन्न खाईल पण ते अंगी लागणार नाही. औषधे घेईल पण उपयोग होणार नाही. त्याचे हार्द निश्चितच मन व भावनांशी निगडीत आहे. यातून मृत्यूसुद्धा उद्भवू शकतो. कधी कधी तो आघात र अति तीव्र असेल तर मृत्यू येतो, अगदी तत्कालसुद्धा.

२०६