पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एकटेपण ही अशी गोष्ट आहे की त्याचा देहावर अति वाईट परिणाम होऊ शकतो. त्या स्थितीत शरीराची प्रतिकारक्षमताच कमी होत असल्यामुळे त्या प्रमाणात आरोग्य नष्ट होते. आपण वर निरनिराळ्या जोड्या पाहिल्या, माता आणि बालक, पती आणि पत्नी, हे संबंध अर्थातच जास्त घनिष्ठ व एकरूपतेला अनुकूल आहेत. पण अगदी एकटी व्यक्तीसुद्धा या भावनांची बळी ठरू शकते. बालपणीच दूरगावी होस्टेलमध्ये राहणारी मुले, घरात दिवस दिवस एकटे राहावे लागणारी मुले, स्वतंत्रपणे एक एकटे जगणारे तरुण, तरुणी ही काही उदाहरणे. पण हा प्रकार पाश्चात्य राष्ट्रे व अशी शहरे की ज्यांत शेजारी कोण राहतो हेही माहीत नसते, वृद्धावस्थेत एकटे त्यजित जीवन जगावे लागणारी माणसे ही एकाकीपणाच्या समस्यांचे निश्चित बळी ठरतात. भारतात त्यामानाने अशा कथा कमी. हा एकटेपणा म्हणजे समाजापासून झालेला दुरावा. कॅलिफोर्नियातील एका पाहणीत असे आढळून आले की एकाकी जीवन जगणाऱ्या स्त्रियांत कर्करोगाचे प्रमाण बरेच असते व त्यातून मृत्यूही लवकर येतात.
 विरहामुळे त्वरित मृत्यूची उदाहरणे फक्त पती व पत्नीचे बाबतच होत नाहीत, तर भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, पिता-पुत्र यांचेही बाबत घडू शकते. राम वनवासास निघाला व त्या वेळी दशरथाची प्रकृती काही ताबडतोब मृत्यू येईल अशी नव्हती. पण राम अयोध्या सोडून निघून गेल्यावर त्याच्या विरहाच्या दुःखाने तो राम, राम म्हणत मरण पावला. अश्वत्थामा हा आपला पुत्र मारला गेला आहे ह्या बातमीमुळे द्रोणाचार्यांनी शस्त्र टाकून मृत्यू स्वीकारला. अशीच एक बहिणी- बहिणींची कथा प्रसिद्ध आहे.

 नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणाऱ्या दोन तरुणी जुळ्या बहिणी होत्या. त्यांपैकी कोणीही लग्न केले नव्हते व कधीही वेगळ्या राहिल्या नव्हत्या. त्यांच्या विशी-पंचविशीत त्यांना असे वाटू लागले की आपल्यात काही मानसिक बदल होत आहेत, आपल्या मानवी भावभावना कमी कमी होत आहेत, सामाजिक गाठीभेटी, बंध नकोसे वाटत आहेत. झोपही ठीक न लागता त्यांना अनेक वेळा निरनिराळे भास होऊ लागले. भूक कमी झाली, पचन नीट होईना. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना स्किझोफ्रेनिया (Schezofrenia) म्हणजे दुभंग व्यक्तिमत्त्वाचा आजार झाल्याचे

२०७