पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आढळले. त्यांच्या आईवडिलांनी आपल्या या कन्यांचा संभाळ व सेवा करण्याचा एका दशकापेक्षाही जास्त वर्षे प्रयत्न केला. परंतु काहीही सुधारणा होईना. तेव्हा अधूनमधून वैद्यकीय सल्लागाराकडे जाण्यापेक्षा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ती तारीख होती एक एप्रिल १९६२.
 हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्यांनी अन्नत्याग केला, कोणालाही भेटण्यास त्या अनिच्छा दाखवू लागल्या. हॉस्पिटल स्टाफच्या चौकशीस अगदी मोजकी उत्तरे मिळू लागली. स्टाफची अशी कल्पना झाली की, या दोघी एकमेकींच्या सतत सहवासामुळे अशी नकारात्मक भूमिका वठवत आहेत. सबब त्यांना वेगवेगळ्या व दूरच्या खोल्यांत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, व त्याप्रमाणे त्यांची फारकत करण्यात आली. येथेच खेदकारक घटनांची सुरुवात झाली.

 त्या दोघींची फारकत झाली त्याच संध्याकाळी व रात्री १०.२० वा., ११.३० वा. व १२ वाजता त्यांची नेहमीची तपासणी व चौकशी करण्यात आली. उद्देश या ताटातुटीमुळे त्यांच्यात प्रतिसादात्मक बदल काय होत आहेत, हे पाहणे हाच होता. या तीनही वेळी केल्या गेलेल्या सर्व तपासण्यांत काहीही दोष आढळला नाही. त्यांचा श्वासोच्छ्वास नेहमीप्रमाणे चालू होता. पुढील तपासणी रात्री १२.४५ ची होती. त्या वेळी संबंधित स्टाफ तपासणीस गेला असता त्यांतील एक मुलगी मृत झालेली आढळली. दुसरी मुलगी ज्या खोलीत ठेवली होती तेथे आणखी एक रुग्ण होता. चौकशीत त्याने त्या काळात या मुलीची एकूण वर्तणूक कशी होती ह्याचे वर्णन केले. तो म्हणाला की, ही तरुणी आपल्या खोलीच्या खिडकीशी जाऊन तिची बहीण ज्या खोलीत होती तिकडे टक लावून पाहत बसली होती. ही वर्तणूक काही असामान्य नव्हती. परंतु नंतर ही मुलगीही मृत झाली. आपली बहीण गेली हे तिला कळले. प्रश्न असा उद्भवतो की त्या दुसऱ्या मुलीला आपल्या बहिणीचा झाला आहे हे कसे कळले? एवढे अंतर असूनही त्यांचा संवाद चालू होता का ? चालू असेल तर त्याचे माध्यम काय? हे किंवा असे अनेक प्रश्न अशा निरनिराळ्या कहाण्यांमधून उद्भवत असतात. आधुनिक वैद्यकशास्त्रात किंवा एकूण आजच्या प्रगत कालखंडातील शास्त्रांमध्ये याची उत्तरे मिळत नाहीत. तो भारतीय तत्त्वज्ञानात मात्र निश्चित मिळतात. हा देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे. त्यामुळे वरवर

२०८