पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असली तरी पंचमहाभूतांची अनंत रूपे आहेत. मनेही एका अर्थाने सर्वांचीच एक आहेत, पण ती सुप्त अवस्थेत. पण या अग्नीवर जी विस्मृतीची खूप राख साठलेली असते ती दूर करण्यास तत्त्वज्ञानाचाच आधार घ्यावा लागतो. शरीर म्हणजे स्थूलदेह व मन म्हणजे सूक्ष्मदेह. तेव्हा निरनिराळ्या व्यक्ती मनाच्या उन्नत अवस्थेमध्ये जर एकरूप असतील तर देह जरी वेगळे असले तरी खऱ्या अर्थाने ही एकरूपता जन्म, जीवन व मृत्यू या सर्व स्थितीत असू शकते. त्यामध्ये काहीही भिंती नाहीत. असे जर असेल तर विश्वच एक माया आहे. अ, ब, क, ड अशा व्यक्तींची स्वतंत्र रूपे म्हणजे मायेचा खेळ हे समजू शकते. मनुष्य जेव्हा हे जाणतो तेव्हा त्याला इच्छामरण सहज शक्य होते. बालासिंगची कहाणी, आफ्रिकेतील हूडू अशा या कहाण्या आपण पाहिल्या. त्या म्हणजे तीव्र इच्छाशक्तीने या मायेचा भेद केला व स्वतःच्या इच्छेने अनंतात विलीन होण्याच्या कहाण्या आहेत. या सर्व कहाण्या व्यवहारातील दुःखद कहाण्या आहेत. पण अनंतामध्ये सर्वत्र असे होते का? या विरुद्ध अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही का घडू नयेत? तशा त्या घडतात. पातंजल योगदर्शनातील सिद्धी याच आहेत. त्या प्राप्त कशा करावयाच्या हे त्यामध्येच शोधावे लागते. ते आपण पुढे पाहू.
श्रद्धा एक अमृतवेल

 श्रद्धा ही एक श्रेष्ठ भावना आहे आणि ती ओघानेच मनाशी निगडीत आहे. आपण पाहिले आहे की, छांदोग्य उपनिषदामध्ये अन्न ह्या संकल्पनेची त्रिविध रूपे आरुणी या ऋषींनी सांगितली आहेत. अन्नाचा बाह्य भाग टाकाऊ असतो. त्याचे अंतिम रूपांतर 'मला' मध्ये होते. मध्यम भागापासून मांस, रक्त आदी अवयव तयार होतात व जो सूक्ष्म अंतर्भाग असतो त्यापासून मन तयार होत असे. मनाचेही असेच वर्णन करता येईल. यासाठी आपल्याला पातंजल योगसूत्राकडे वळावे लागते. पातंजल योगाला डॉ. कोल्हटकर यांनी भारतीय मानसशास्त्र असे अभिधान दिलेले आहे. हल्लीचे मानसशास्त्र म्हणजे मनाच्या फक्त बाह्यांगाशी निगडीत शास्त्र असे म्हणता येईल. अंतर्मनाच्या शास्त्राला परामानसशास्त्र असे म्हटले गेले आहे. जगामध्ये अनेक ठिकाणी व अनेक चमत्काराच्या घटना घडत असतात. त्यांतील ज्या बनावट असतात त्या आकलनीय व खोट्या आहेत हे सिद्ध करता येते. परंतु अनाकलनीय

२०९